Join us  

रियाची सीबीआयकडून सलग तिसऱ्या दिवशी नऊ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:32 AM

सुशांतच्या पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यामागील सीबीआयचा ससेमिरा कायम राहिला आहे. रविवारी सलग तिसºया दिवशी तिची विशेष पथकाकडून सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. तिच्यासह भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, श्रुती मोदी यांचीही झाडाझडती घेण्यात आली. सर्वांकडून या प्रकरणासंदर्भातील अनेक महत्त्वाची माहिती घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सुशांतच्या पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.रिया चक्रवर्ती सलग तिसºया दिवशी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात सीबीआयचे अधिकारी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये पोहोचली. तिच्यासमवेत तिचा भाऊ शोविक होता. त्यांना एकत्रित बसवून चौकशी सुरू करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ पिठानी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास श्रुती मोदीही त्या ठिकाणी आली. सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. रात्री आठपर्यंत त्यांच्याकडे अनेक मुद्द्यांबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यानंतर आजची चौकशी थांबविण्यात आली. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलाविल्याचे सांगण्यात आले.सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाही, गटबाजी, ड्रग कनेक्शनबाबत सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शकावर टीकेची झोड उठविणारी अभिनेत्री कंगणा रानौत रविवारी मुंबई पोलिसांवर घसरली. फिल्मी माफियापेक्षा मला मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटते, असे टिष्ट्वट केले आहे. मला मुंबई पोलीस नको तर हिमाचल प्रदेश किंवा केंद्र सरकारने बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी तिने केली. भाजपचे आमदार राम कदम यांनी तिचे समर्थन केले आहे, मात्र तिच्या या वादग्रस्त टिष्ट्वटचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. प्रसिद्धीसाठी काहीही बरळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत, महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत त्यांनी तिचा निषेध केला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हेगारी