Join us  

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रियाला अखेर अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:34 AM

एनसीबीची कारवाई

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली त्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. तीन दिवस १९ तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिची वैद्यकीय तपासणी व कोरोना चाचणी करण्यात आली. रात्री बिलार्ड पियार्डच्या एनसीबीच्या कार्यालयातून तिला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तिला कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिची रवानगी भायखळा येथील महिला कारागृहात उपलब्धता पाहून केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रिया हिच्यावर एनपीडीएस अ‍ॅक्टच्या कलमांतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणे, बाळगणे आणि ते इतरांना पुरविण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ईडीने तिच्या मोबाईल चॅटचा तपास केला असताना ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून चौघांना जामीन मिळाला आहे. अटक केलेल्यांमध्ये सुशांतसिंहशी थेट संबंधित रिया, तिचा भाऊ शौविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि नोकर दीपेश सावंत यांचा समावेश आहे. त्यांची एनसीबी कोठडी संपत असून त्यांनाहीउद्या कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. 

ईडी, सीबीआयच्या तावडीतून सुटून एनसीबीच्या जाळ्यात!

सुशांतसिंहच्या वडिलांनी पटणा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील गुन्हा सीबीआयकडे वर्ग झाल्यावर ईडीने याप्रकरणी मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला. रियाकडे शेकडो तास चौकशी केली त्यानंतर सीबीआयकडूनही अनेकदा चौकशी झाली. त्यातून सहीसलामत बाहेर पडलेली रिया ‘एनसीबी’च्या गुन्ह्यात मात्र अडकली.

‘बड्स’ आणि ‘डब्ज’

या आणि शौविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘बड्स’ आणि ‘डब्ज’ या ड्रग्ज वापरातील सांकेतिक शब्दांचा सर्रास वापर आहे. त्याचप्रमाणे यासंबधी मिरांडा, गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या यांच्याशी चॅट केल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने त्यांच्या भोवतीचा फास आवळला. गौरव आर्यालाही लवकरच पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.अशी झाली अटकेची कारवाई

नसीबीने रियाकडे सलग तीन दिवस १९ तास चौकशी केली. पहिल्यांदा तिच्याकडे स्वतंत्रपणे ड्रगसंबधी मोबाईलवरील चॅट, सुशांतसाठी मागिवलेले ड्रग्ज तसेच तिच्याशी संबंधित इतरांनी दिलेल्या जबाबाबाबत विचारणा करण्यात आली.त्यानंतर शौविक, सॅम्युअल, दीपेश यांना समोरासमोर आणून तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रियाने ड्रग मागिवल्याची कबुली दिली असली तरी त्याचे स्वत: सेवन केल्याचा इन्कार केला असून या जबाबाबाबत ती शेवटपर्यंत ठाम राहिल्याचे समजते.

ड्रग कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेली रिया चक्रवर्ती ही बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरली आहे. पूर्वाश्रमीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावरही अशाच प्रकारचे आरोप झाले होते. मात्र, ती पोर्तुगालमध्ये वास्तव्यास असल्याने अद्याप अटक होऊ शकली नाही. वकिलामार्फत ती केस लढत आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतपोलिस