छुपे कॅमेरे आढळल्यास परवाना रद्द
By Admin | Updated: June 17, 2015 03:00 IST2015-06-17T03:00:13+5:302015-06-17T03:00:13+5:30
मॉल व दुकानांमधील महिलांच्या चेंजिंग रूम व शौचालयांमध्ये छुपा कॅमेरा सापडल्यास त्या आस्थापानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करा

छुपे कॅमेरे आढळल्यास परवाना रद्द
मुंबई : मॉल व दुकानांमधील महिलांच्या चेंजिंग रूम व शौचालयांमध्ये छुपा कॅमेरा सापडल्यास त्या आस्थापानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करा, अशी सूचना करीत याबाबत नेमकी कशी कारवाई केली जाईल, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले.
बलात्कार, अॅसिड हल्ला व विनयभंगाच्या प्रकरणांतील पीडित महिलांशी कसे वागावे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी कसे बोलावे याचेही प्रशिक्षण पोलिसांना देणे गरजेचे आहे, अशी सूचना करीत या सूचनांची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार याचे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश खंडपीठाने शासनाला दिले.
बलात्कार, अॅसिड हल्ला व विनयभंगाच्या प्रकरणांतील पीडितांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येतील, अशी माहिती शासनाने न्यायालयाला दिली. अशा पीडितांवर खाजगी रुग्णालयाने तत्काळ उपचार करावेत व त्यांना नंतर परतावा दिला जाईल, असेही शासनाने न्यायालयात स्पष्ट केले. याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)