Join us  

तोटयात असणाऱ्या एसटीला 'मालवाहतुकीची' नवसंजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:09 PM

एसटी महामंडळाचे चाक तोट्याच्या खड्यात रुतले आहे. अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे.

मुंबई :  एसटी महामंडळाचे चाक तोट्याच्या खड्यात रुतले आहे. अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले  

राज्य सरकारने १८ मे रोजी काढलेल्या आद्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी बसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. सध्या एसटीकडे स्वतःची  ३०० मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरु करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून झाला, असे, परब म्हणाले. 

सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले आहे. त्यांच्यामार्फत एम. आय. डी. सी.  कारखानदार, लघुद्योजक, कृषिजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये राज्य सरकारचे अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या मालवाहतुकीमधून पाठविण्यास तयार आहेत. 

एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर ३१ विभागीय कार्यालये,३३ विभागीय कार्यशाळा असा, मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे, अशी माहिती एसटी महामंडळ विभागाकडून देण्यात आली. 

--------------------------------

मागील ६ दिवसात राज्यभरात ४१ ट्रकसाठी मालवाहतुकीचे बुकिंग प्राप्त झाले आहे. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव व गडचिरोली या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.

--------------------------------

राज्याची जीवन वाहिनी असलेल्या एसटीने १ जुन रोजी ७२ व्या वर्षात पर्दापण केले.  १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर आपली पहिली एसटी धावली.  

--------------------------------- 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या