Join us

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 07:12 IST

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ११ ते १८ जुलैदरम्यान

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ११ ते १८ जुलै या कालावधीत बहुतांश सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या १४ जुलैपासून सुरू होणार आहे.

एमसीए, पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आता हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ११ जुलैपासून, एमबीए, औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्म प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १२ जुलैपासून, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अनुक्रमे १५ आणि १६ जुलैपासून सुरू होणार आहे. तर उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील तीन वर्षे विधि अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ११ ते १३ जुलै या कालावधीत सुरू केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली. 

औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्म) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

उच्च शिक्षण अभ्यासक्रमाचे वेळापत्रक एलएलबी ३ वर्ष - ११ जुलै बीएड/एमएड - १२ जुलै बीपीएड - १२ जुलै एमपीएड - १२ जुलै एमएड - १२ जुलै बीएड - १३ जुलै

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे वेळापत्रक बी.एचएमसीटी - ११ जुलै एमबीए/एमएमएस - १२ जुलै बी.डिझाईन - १२ जुलै बी.फार्मसी - १२ जुलै (सरावासाठी) एम.एचएमसीटी- १३ जुलै थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी - १५ जुलै थेट द्वितीय वर्ष फार्मसी - १६ जुलै एमसीए- १७ जुलै एम.फार्म- लवकरच बी.फार्म - लवकरच जाहीर होणार 

टॅग्स :मुंबईपरीक्षा