१३ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत सई परांजपे यांनी केले 'इवलेसे रोप’चे लेखन-दिग्दर्शन
By संजय घावरे | Updated: March 2, 2024 19:10 IST2024-03-02T19:10:21+5:302024-03-02T19:10:50+5:30
रोप बहरण्यासाठी त्याला जसे खतपाणी घालावे लागते तसेच नाते बहरण्यासाठी प्रेमाचे आणि विश्वासाचे खतपाणी घालायचे असते.

१३ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत सई परांजपे यांनी केले 'इवलेसे रोप’चे लेखन-दिग्दर्शन
मुंबई - ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे १३ वर्षांनी रंगभूमीवर परतल्या आहेत. 'इवलेसे रोप' हे नवे नाटक नाट्यरसिकांसमोर सादर करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. या नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सई यांनीच सांभाळली असून, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.
रोप बहरण्यासाठी त्याला जसे खतपाणी घालावे लागते तसेच नाते बहरण्यासाठी प्रेमाचे आणि विश्वासाचे खतपाणी घालायचे असते. अशाच मुरलेल्या नात्याची खुमासदार गोष्ट सई परांजपे आपल्या नव्या कोऱ्या नाटकात सांगणार आहेत. रावेतकर प्रस्तुत, नाटक मंडळी प्रकाशित आणि खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई निर्मित, ‘इवलेसे रोप’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ मार्चला कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे होणार आहे. या नाटकात मंगेश कदम, लीना भागवत, मयुरेश खोले, अनुष्का गिते, अक्षय भिसे यांच्या भूमिका आहेत. या नाटकाबाबत सई परांजपे म्हणाल्या की, ‘इवलेसे रोप'ची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक हे माध्यम मला अधिक योग्य वाटले. कोणत्याही नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात. या गोष्टींचा उहापोह या नाटकात गमतीदारपणे करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. सई परांजपे यांनी ‘इवलेसे रोप' हे छान नाटक आम्हाला गिफ्ट केले असून, उत्तम संहिता असलेले हे नाटक करायला मिळाल्याचा आनंद असल्याची भावना मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी व्यक्त केली आहे.
नाते या शब्दाची जादूच वेगळी आहे. प्रत्येक नात्याची मजा ती उलगडण्यातच येते, पण जास्त आनंद ते नाते जपण्यात आणि आयुष्यभर निभावण्यात असते. मोजायला गेल्या तर कालांतराने नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नाते जेव्हा पिकते तेव्हा अधिक गोड होते या टॅगलाइनसह आलेल्या ‘इवलेसे रोप’ या नाटकात ‘माई’ आणि ‘बापू’ या जोडप्याच्या नात्यातील विविध रंग पाहायला मिळणार आहेत.
सई परांजपे यांनी लेखन-दिग्दर्शन करत व्यावसायिक नाटके, बालरंगभूमी, चित्रपट, माहितीपट, लघुपट अशा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘स्पर्श’ तसेच ‘चष्मेबद्दूर’,‘कथा’,‘दिशा’, ‘पपिहा’, ‘साज’ यांसारख्या वेगळय़ा धाटणीचे चित्रपट आणि अनेक दर्जेदार नाटके देणाऱ्या सई परांजपे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे सन्मान लाभले आहेत.