रेल्वे अधिका-यांची पाचावर धारण

By Admin | Updated: March 9, 2015 01:19 IST2015-03-09T01:19:57+5:302015-03-09T01:19:57+5:30

कल्याण रेल्वे स्थानक परिसराला आमदार नरेंद्र पवार यांनी अचानक भेट दिली. तेथील विविध नागरी समस्यांचा त्यांनी आढावा घेतला.

Retention of Railway Officials | रेल्वे अधिका-यांची पाचावर धारण

रेल्वे अधिका-यांची पाचावर धारण

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसराला आमदार नरेंद्र पवार यांनी अचानक भेट दिली. तेथील विविध नागरी समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यांच्या या सरप्राइज व्हिजिटने अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाले, गर्दुल्ल्यांनी विळखा घातला आहे. असंख्य तक्रारींनंतरही स्थानक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमदार नरेंद्र पवार यांनी गुरुवारी सकाळी जुना स्टेशन रोड, स्कायवॉक, रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. बेशिस्त वाहनाचलक, स्थानकातील गैरसोयी आणि महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कल्याणकरांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी शासकीय यंत्रणांना कोणतीही पूर्वसूचना न देता परिसराची पाहणी केली. या दौऱ्यात अनेक धक्कादायक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. महंमद अली चौकातून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या आणि नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर दुतर्फा फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे, ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
स्कायवॉकवरही तीच स्थिती आहे. पवार यांनी तेथेही पाहणी केली. तिथे फेरीवाले, गर्दुल्ल्यांचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. त्याबाबत स्थानक प्रबंधक, जीआरपी, आरपीएफ यांना जाब विचारल्यावर हद्दीसह अन्य थातूरमातूर कारणे पुढे करत वेळ मारून नेली. या पाहणी दरम्यानच आमदारांनी महापालिका ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांना परिसरातील फेरीवाल्यांबाबत जाब विचारला. त्यावर आपण २४ तास फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही, असे सांगत कुलकर्णी यांनी हात वर केले.
मात्र पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत फेरीवाल्यांकडून महापालिकेला हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत
त्रागा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Retention of Railway Officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.