Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाला अद्याप मुहूर्त मिळेना; परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसमोर नवे विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 07:45 IST

यंदा फेब्रुवारी २०२१ मध्ये होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.  शिष्यवृत्ती परीक्षा होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला, तरीही अद्याप निकालाबाबत परीक्षा परिषदेने अधिकृतरीत्या कोणतीही सूचना न दिल्याने शिक्षक, पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

यंदा फेब्रुवारी २०२१ मध्ये होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. अखेर तब्बल चारवेळा पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. आता परीक्षेच्या निकालाची आणि गुणवत्ता यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी करत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहीर होणे अपेक्षित होते. निकालाचे कामकाज अद्याप अपुरे असल्यामुळे दिरंगाई होत असल्याचे कळत आहे. 

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे कामकाज पूर्ण झाले आहे. परंतु इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेतर्फे देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे लवकरच निकाल लागण्याची चिन्हे आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी झाली, तर शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची २४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी अंतिम उत्तरसूची जाहीर झाली.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा मानस होता. परंतु, अद्याप परीक्षा परिषदेने निकालाची अधिकृत घोषणा न केल्याने विद्यार्थ्यांना निकालाची आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ४७ हजार ६१६ शाळांमधील एकूण सहा लाख ३२ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण तीन लाख ८८ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन लाख ४४ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

टॅग्स :शिष्यवृत्ती