Join us  

यंदाचा निकाल म्हणजे वाढीव गुणांची कमी झालेली सूज - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 6:36 AM

२००७ पर्यंत २० मार्कांचे अंतर्गत गुण देण्याची पद्धत नव्हती. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत सुरू झाली.

मुंबई : यंदाची निकालाची टक्केवारी ७७.१० टक्के इतकी असून गेल्या वर्षीची टक्केवारी ८९.४१ इतकी होती. त्या निकालाच्या तुलनेत यंदाचा १२.३१ टक्के निकाल कमी लागला. या पार्श्वभूमीवर स्वाभाविकपणे काही पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असली तरी काही शिक्षण तज्ज्ञांनी या निकालासंदर्भात समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेला यंदाचा निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाल्याची प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या निकालावर दिली.

२००७ पर्यंत २० मार्कांचे अंतर्गत गुण देण्याची पद्धत नव्हती. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत सुरू झाली. ही पद्धत २०१८ पर्यंत सुरू होती. गेल्या वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाकडून ती थांबविण्यात आली. २००७ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पद्धत नव्हती. त्या वेळी शालान्त परीक्षेचा निकाल ७८ टक्के लागला होता आणि त्यानंतर जेव्हा ही पद्धत २००८ मध्ये सुरू झाली, त्या वेळी शालान्त परीक्षेचा निकाल ८७.४१ टक्के इतका लागला. या निकालात २००७ च्या तुलनेत सुमारे ९ टक्के एकदम वाढ झाल्याची माहिती तावडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळू शकेल. दहावीच्या निकालात जर विद्यार्थ्याला त्याची गुणवत्ता कळली तर तो विद्यार्थी त्या पद्धतीचे करिअर निवडू शकतो, त्यातून त्या विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या निकालामुळे निराश होण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण देत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यंदाची गुणपद्धती कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला.मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. या फेरपरीक्षेसाठी जर महिन्याभरात चांगला अभ्यास केला तर स्वाभाविकपणे फेरपरीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेता येईल, अन्यथा कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्थासुद्धा आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे विद्यार्थी शिक्षित झाला तर तो विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, असे तावडे यांनी संगितले. 

टॅग्स :विनोद तावडेदहावीचा निकाल