म्हाडामार्फत पुनर्विकासाला बीडीडीकरांचा विरोध

By Admin | Updated: July 31, 2015 03:09 IST2015-07-31T03:09:24+5:302015-07-31T03:09:24+5:30

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करण्याच्या निविदा मागवताच बीडीडीकरांनी म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यास विरोध दर्शविला आहे.

Result of BDDC to the redevelopment through MHADA | म्हाडामार्फत पुनर्विकासाला बीडीडीकरांचा विरोध

म्हाडामार्फत पुनर्विकासाला बीडीडीकरांचा विरोध

मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करण्याच्या निविदा मागवताच बीडीडीकरांनी म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यास विरोध दर्शविला आहे. मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यास म्हाडा सक्षम नसून शासनाच्या नियंत्रणाखाली खासगी विकासकांमार्फत पुनर्विकास व्हावा यासाठी बीडीडीकर सरसावले आहेत.
मुंबईत ९३ एकर भूखंडावर बीडीडी चाळी आहेत. वरळी येथे १२१, डिलाईल रोड ३२, नायगाव ४२ आणि शिवडी येथे १२ अशा एकूण २0७ चाळी आहेत. या चाळींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळताच बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीने बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यास विरोध दर्शविला आहे. म्हाडाच्या वसाहती आणि संक्रमण शिबिरांची दुर्दशा झाली आहे. म्हाडाने उभारलेल्या इमारती निकृष्ट दर्जाच्या असल्याने म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यास समितीने विरोध दर्शविला आहे.
बीडीडी चाळींतील रहिवाशांना ५00 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, देखभाल खर्च नसावा, आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, आदी प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. समितीच्या मागण्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीने बीडीडी चाळींमध्ये सभा घेण्यास प्रारंभ केला आहे. बीडीडी चाळी मोठ्या प्रमाणावर असल्याने या चाळींचा पुनर्विकास करण्यास म्हाडा सक्षम नाही. शासनाने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करून खासगी विकासकांमार्फत पुनर्विकास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण देशमेहरे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Result of BDDC to the redevelopment through MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.