रमजान ईदला सार्वजनिक ठिकाणी नमाजवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:06 IST2021-05-12T04:06:22+5:302021-05-12T04:06:22+5:30
काेराेना संसर्गामुळे घरीच ईद साजरी करण्याचे गृह विभागाचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, ...

रमजान ईदला सार्वजनिक ठिकाणी नमाजवर निर्बंध
काेराेना संसर्गामुळे घरीच ईद साजरी करण्याचे गृह विभागाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या रमजान ईद दिनी मशीद, ईदगाह आदी सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्याला निर्बंध घालण्यात आले आहेत. मुस्लीम बांधवांनी घरीच राहून साधेपणाने ईद साजरी करावी, असे आवाहन गृह विभागाने केले असून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
बुधवारी चंद्र दर्शन झाल्यास गुरुवारी अन्यथा १४ मे रोजी ईद साजरी केली जाईल. त्याबाबत अद्याप हिलाल कमिटीने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
ईदच्या दिवशी मिरवणूक, शोभायात्रेस, मशीद, दर्गामध्ये जाण्यास नागरिकांना बंदी आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या इमाम व अन्य कर्मचाऱ्यांना नमाज अदा करण्यास परवानगी आहे. राज्यात सुरू असलेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव पाहता मुस्लीम बंधू-भगिनीनी, एकमेकांना ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे शुभेच्छा द्याव्यात, कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढू नये. संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
...........................