अवैध व्यवसायांना लगाम
By Admin | Updated: August 11, 2015 03:35 IST2015-08-11T03:35:49+5:302015-08-11T03:35:49+5:30
शहरात समाजविघातक अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. तीन महिन्यांत जुगार अड्डे, बार, मटका व इतर ३९ ठिकाणी धाड टाकून तब्बल ३७९ आरोपींना

अवैध व्यवसायांना लगाम
- नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरात समाजविघातक अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. तीन महिन्यांत जुगार अड्डे, बार, मटका व इतर ३९ ठिकाणी धाड टाकून तब्बल ३७९ आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ७८ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई सुनियोजित शहर असले तरी वाढत्या शहराबरोबर येथील गुन्हेगारीही वाढू लागली आहे. जुगार अड्डे खुलेआम सुरू होते. शेजारच्या शहरातील एक नगरसेवकच बेलापूर परिसरात जुगार अड्डा चालवत होता. तुर्भे, एपीएमसी, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे परिसरात खुलेआम जुगार सुरू होते. तुर्भेमध्ये अनेक माथाडी कामगारांनी महिन्याचा पगार जुगारात घालवला. अनेकांनी मुलांच्या लग्न व घरासाठी घेतलेले पैसे उधळून टाकले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होवू लागले होते. नागरिकांनी तक्रारी केल्या तरी ठोस कारवाई होत नव्हती. यामुळे सामान्य नागरिकांनी तक्रारी करणेही थांबविले होते. परिमंडळ एकच्या उपआयुक्त पदाची धुरा घेताच शहाजी उमाप यांनी मोहीम हाती घेऊन सर्वप्रथम समाजविघातक व्यवसाय करणाऱ्यांना जेरबंद करण्यास सुरवात केली आहे.
पिटाअंतर्गत ६ जणांवर कारवाई
शहरातील अवैध बार, मसाज सेंटरवर धाड टाकण्यात आली. पिटाअंतर्गतही एक कारवाई केली असून ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल व डिझेल चोरी होत असते. या विरोधातही जोरदार मोहीम राबविली आहे. तीन महिन्यात टाकलेल्या धाडींमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
पोलिसांचे कौतुक
तीन महिन्यांत पोलिसांनी सुरू केलेल्या धाडसत्राचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. जुगार अड्डे बंद पडल्यामुळे अनेकांचे अनेक कामगार व कष्टकरी नागरिकांची होणारी फसवणूक व नुकसान थांबले आहे. बारमधील अवैध प्रकारांना आळा बसू लागला आहे. आतापर्यंत अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यास सामान्य नागरिक पुढे येत नव्हते. परंतु आता पोलिसांविषयी विश्वासार्हता वाढली असून तक्रारी करण्यास नागरिकही पुढे येवू लागले आहेत.
नागरिकांना आवाहन
शहरात कोणत्याही स्थितीमध्ये अवैध व्यवसाय चालू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी घेतली आहे. अवैध व्यवसायाची माहिती मिळताच तत्काळ धाड टाकली जात आहे. शहरात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असेल तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल व संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे उमाप यांनी स्पष्ट केले आहे.