Join us

वांद्रे स्थानकालगत लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील उभारणार; रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:16 IST

स्थानकालगतचे ३,५०० चौरस मीटरचे क्षेत्र खुले

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकालगत पश्चिमेला लोहमार्ग पोलिस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्याने त्याठिकाणी ३५०० चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा विकास करण्यात येणार असून, त्याठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील, तसेच इतर सविधा विकसित करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वांद्रे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या गुरू नानक रोडच्या बाजूने एक मोठी भिंत होती. त्या भिंतीच्या मागे डंप एरिया तयार झाला होता. हा भाग स्थानकाचे सौंदर्य खराब करत असून, त्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग देखील करण्यात येत होती. आता ही भिंत पाडल्यामुळे मोठी जागा उपलब्ध झाली आहे. आता त्या ठिकाणी रेल्वेच्या जुन्या डब्याचा वापर करून लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील्स, तसेच इतर सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध होतील असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानक परिसराचा विकास

वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक जिर्णोद्धारानंतर स्थानक लागताच आणखी काही भाग मोकळा करण्यात आला आहे. अनावश्यक स्टॉल्सची जागा बदलणे, बॅरिकेड्स स्थलांतरित करणे, ऑटो आणि इतर वाहनांना स्थानकाजवळ येण्यापासून रोखाने अशा उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामुळे पादचारी प्लाझा आणि प्रवाशांना मुक्तसंचारासाठी अधिक क्षेत्र तयार झाले आहे. तसेच प्रवाशांना आणखी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वे मोकळ्या जागा निर्माण करत असून, नवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी स्थानक परिसराचा विकास करत असल्याचे पश्चिम रेल्वे हे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

वांद्रे टर्मिनसला स्कायवॉकने जोडणार

वांद्रे पश्चिमेसोबतच पूर्वेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी काही योजना तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वांद्रे टर्मिनसला उपनगरीय स्थानकाशी जोडण्यासाठी २४ कोटी रुपयांचा ३४० मीटर लांबीचा स्कायवॉक प्रस्तावित केला आहे. या स्कायवॉकमुळे वांद्रे पूर्व स्थानकातून टर्मिनसपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटो रिक्षा सोबतच आणखी एक पर्याय ठरणार आहे. 

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे