बदलापुरातील उर्वरित राष्ट्रवादी शिवसेनेत?

By Admin | Updated: December 26, 2014 22:52 IST2014-12-26T22:52:45+5:302014-12-26T22:52:45+5:30

आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्यावर अर्धी राष्ट्रवादी ही कथोरेंसोबत भाजपात गेली होती.

Rest of the remaining NCP is Shiv Sena? | बदलापुरातील उर्वरित राष्ट्रवादी शिवसेनेत?

बदलापुरातील उर्वरित राष्ट्रवादी शिवसेनेत?

पंकज पाटील, बदलापूर
आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्यावर अर्धी राष्ट्रवादी ही कथोरेंसोबत भाजपात गेली होती. त्यानंतर, उर्वरित राष्ट्रवादीचे जे नगरसेवक शिल्लक राहिले होते, त्यांच्यासह काही बडे पदाधिकारी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बदलापुरात राष्ट्रवादीचा पदाधिकारी शोधून सापडणार नाही, अशी अवस्था झाली आहे.
किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्यासोबत तत्कालीन शहराध्यक्ष आणि नगरसेवक शरद तेली, रमेश सोळसे, विवेक मोरे, नरहरी पाटील, मिथुन कोशिंबे या नगरसेवकांसह माजी नगरसेवक संभाजी शिंदे आणि काही बडे पदाधिकारी भाजपात गेले. त्यानंतर, राष्ट्रवादी पक्ष हा बदलापुरात कमजोर झाला होता. त्याची प्रचीतीही विधानसभा निवडणुकीत आली. मताधिक्य घटल्याने जे नगरसेवक कथोरेंसोबत गेले नाहीत आणि त्यांनी प्रत्यक्षात कथोरेंची नाराजी स्वीकारली, त्या नगरसेवकांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरू केली होती. कथोरेंसोबत न गेलेले आणि राष्ट्रवादीत राहिलेले जे-जे पदाधिकारी आहेत, त्यांना शिवसेनेत घेण्यासाठी शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रयत्न सुरू केले होते.
अखेर, राष्ट्रवादीचे विद्यमान शहरप्रमुख नगरसेवक श्रीधर पाटील, रवींद्र चव्हाण, मसूद कोहारी, संजय गायकवाड, रतिका सोनावणे, माजी नगरसेविका स्वप्ना पाटील, दिलीप सुरवळ, तुषार साटपे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष अनिता नवले यांच्यासह अनेक पदाधिकारी हे शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित होताच जे थोडेफार पदाधिकारी राष्ट्रवादीत शिल्लक आहेत, तेदेखील आता शिवसेना आणि भाजपाची वाट पकडण्याच्या तयारीत आहेत. अशात बदलापुरात राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक आता शिल्लक राहिलेला नसून पदाधिकारीदेखील पक्षातून बाहेर पडत आहेत.

Web Title: Rest of the remaining NCP is Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.