मेट्रो ३साठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा प्रतिसाद
By Admin | Updated: May 13, 2015 00:44 IST2015-05-13T00:44:56+5:302015-05-13T00:44:56+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३. ५ किलो मीटर लांबीच्या मेट्रो - ३ प्रकल्पाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

मेट्रो ३साठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा प्रतिसाद
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३. ५ किलो मीटर लांबीच्या मेट्रो - ३ प्रकल्पाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ७ टप्प्यांच्या बांधकामासाठी ९ कंपन्यांनी एकूण ३१ निविदा दाखल झाल्या असून पहिल्या ४ टप्प्यांसाठी प्रत्येकी ४ तर अंतिम तीन टप्प्यांसाठी अनुक्रमे ५,७ आणि ३ निविदा दाखल करण्यात आल्या आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो ३ प्रकल्पासाठी निविदा मागविल्या होत्या. हा मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. ७ टप्प्यांच्या बांधकामासाठी ९ कंपन्यांनी ३१ निविदा दाखल केल्या आहेत. मेट्रोच्या प्रत्येक टप्प्यात ४ ते ५ किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगदेही असणार आहेत. दरम्यान, आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रोच्या कार डेपोला मुंबईकरांचा विरोध आहे. त्यामुळे यावर तोडगा निघेपर्यंत या प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागविलेल्या निविदेला मिळालेला प्रतिसाद हा प्रोत्साहित करणारा आहे, असे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांनी सांगितले. मेट्रो ३ प्रकल्पामुळे उपनगरीय रेल्वेवरील गर्दी नक्कीच कमी होईल आणि त्यामुळे लोकांचे प्राणही वाचविता येतील. प्रत्येक आयुष्य कसे अमूल्य असते हे ओळखण्याची वेळ आता येऊन ठेपली असल्याचेही भिडे म्हणाल्या. निविदा भरलेल्या कंपन्यांमध्ये अॅफकोन्स इन्फ्रास्ट्रक्चरसह अनेक कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. (प्रतिनिधी)