प्रवाहासोबत राहण्याचा संकल्प
By Admin | Updated: October 7, 2014 00:01 IST2014-10-07T00:01:00+5:302014-10-07T00:01:00+5:30
प्रवाहाच्या विरोधात गेल्यास माणसाचे नुकसान होते. आपण देशात ताकदीने वाहणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवाहासोबत आहोत.

प्रवाहासोबत राहण्याचा संकल्प
पनवेल : प्रवाहाच्या विरोधात गेल्यास माणसाचे नुकसान होते. आपण देशात ताकदीने वाहणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवाहासोबत आहोत. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहेत. या सर्वांच्या ताकदीने देशात महायुतीची सत्ता आली आहे. राज्यातही आपल्याला आपले प्रश्न सोडवून विकास घडवून आणण्यासाठी सत्ता आणायची आहे. त्यासाठी पनवेलमध्ये विकासाचा डोंगर उभा करणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना विजयी करा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आज येथे केले.
पनवेल विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने रविवारी काळण समाज हॉल येथे भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामशेठ ठाकूर, सभाध्यक्ष म्हणून आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, ज्येष्ठ नेते अरुण भगत, जी. आर. पाटील, सिराज सय्यद, आरपीआयचे तालुका अध्यक्ष अमोल इंगोळे, कोकण प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, गौतम पाटेकर, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष मोहनीश गायकवाड, आगरी सेना अध्यक्ष कल्पेश तोडेकर, अल्पसंख्याक पनवेल तालुका अध्यक्ष मजहर पठाण, कामोठे शहर अध्यक्ष संजय पवार, कळंबोली शहर अध्यक्ष सिद्धांत गायकवाड, वाकडी विभाग अध्यक्ष प्रकाश गायकवाड, नवीन पनवेल युवा अध्यक्ष रविराज कसबे, नवीन पनवेल प्रभारी सुंदर शेळके, खांदेश्वर शहर अध्यक्ष नरेश जाधव, सुकापूर विभाग अध्यक्ष बाळा साळवे, तळोजे विभाग अध्यक्ष विश्वास गायकवाड, देवद विभाग अध्यक्ष भगवान भंडारे, भीमनगर अध्यक्ष शिवनाथ वाघमारे, भरत जाधव आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, काल परवापर्यंत आपण सेना शेकापसोबत होतो. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रामदास आठवलेंनी भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवाहात बहुसंख्येने सामील होण्याचा निर्णय घेतला. या बळकट महायुतीमुळे आपली ताकद एकवटली असून कार्यकर्त्यांमध्ये चेतना आली आहे. ही ताकद प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी उभी करण्यासाठी हा मेळावा आहे. (वार्ताहर)