संकल्प भयाला मूठमाती देण्याचा...

By Admin | Updated: January 1, 2015 01:32 IST2015-01-01T01:32:57+5:302015-01-01T01:32:57+5:30

नियतीचा भयाण आघात असो वा समाजकंटकांचा भ्याड हल्ला़़़़ निर्भीड मुंबईकरांनी असंख्य संकटे निधड्या छातीवर झेलत परवतून लावली आहेत़

Resolve to be confused with ... | संकल्प भयाला मूठमाती देण्याचा...

संकल्प भयाला मूठमाती देण्याचा...

'टीम लोकमत'ची स्मशान मोहीम : नव्या वर्षाचे अनोखे स्वागत
नियतीचा भयाण आघात असो वा समाजकंटकांचा भ्याड हल्ला़़़़ निर्भीड मुंबईकरांनी असंख्य संकटे निधड्या छातीवर झेलत परवतून लावली आहेत़ या लौकीकाचा इतिहास काही काल परवाचा नाही़ मात्र हे धाडसी मन कोठे तरी येऊन क्षणासाठी थांबते़ एक चाहूल या धाडसी मनालाही स्तब्ध करते़ असे ठिकाण म्हणजे स्मशाऩ़़ जाती व धर्माने स्मशानाची विभागणी केली़ खरे म्हणजे सुंदर अशा निसर्गात विलीन होणाऱ्या शरीराला याचे काही कौतुक नसते. नष्ट झालेले शरीर भितीरूपाने मानवी कल्पना शक्तीला सतत हेलकावे देत असते. आणि त्यातूनच अंधश्रद्धेसारखे केविलवाणे प्रयत्न सुरू होतात. वास्तविक ज्या बिंदु पलिकडे काही नाही याची जाणीव असूनही सर्वांच्या मनाला ही अनामिक भीती हळूवार स्पर्श करून जाते. महिलांच्या नाजूक मनाला ही भीती तर नकोशीच वाटते. असे असतानाही 'लोकमत'च्या महिला प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाल्या. आणि चिरशांती लाभलेल्या स्मशानातच भीती शोधण्याचा प्रयत्न 'टीम लोकमत'ने विभागणी करुन मध्यरात्री एकाच वेळी विविध ठिकाणी जाऊन केला़़़यातूनच समोर आला तो केवळ मनाच्या खेळाचा सर्वसाधारण अनुभव...नव्या वर्षाचे वेगवेगळे संकल्प सोडले जातात. पण या वर्षासह आगामी जीवनात भयमुक्ततेचा संकल्प सोडल्याचे फारसे जाणवत नाही...त्यामुळेच संपूर्ण समाजाने भयाला कायमची मूठमाती देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सूर्याला नतमस्तक होताना करावा. याच शुभेच्छा देण्यासाठी 'टीम लोकमत'ने केलेला हा छोटासा प्रयत्न....

चिंचपोकळी पश्चिमेकडे रेल्वे स्थानकालगतच ज्यू लोकांची ज्युईश दफनभूमी आहे. आजही तेथे अंधाराचे साम्राज्य आहे. रात्रीची वेळ असल्याने दफनभूमीचे प्रवेशद्वार बंद होते. दरवाजा ठोकूनही कोणी उघडत नसल्याचे पाहून प्रवेशद्वाराशेजारी उघड्या असलेल्या खिडकीतून प्रतिनिधींनी दफनभूमीत प्रवेश केला. तेव्हा तेथे सुरक्षा रक्षक झोपलेले दिसले़ सुरक्षारक्षकांना उठवून स्मशानभूमी पाहण्यासाठी आत सोडण्याची विनंती केली़ आत प्रवेश केल्याकेल्या आम्ही दफनभूमीतील सर्व थडग्यांमधून जाणाऱ्या पायवाटेवरून चालू लागलो. तेवढ्यात अचानक कुत्र्याने जोरजोराने भुंकण्यास सुरूवात केल्यानंतर काही क्षण भीती मनात दाटली. मात्र भीतीला फार थारा लागू न देता पायवाटेवरून पन्नासएक पावले चालल्यानंतर चिरशांततेचा अनुभव येऊ लागला. थडग्यांच्या रांगांमधून चालताना मनात विचारांचे काहूर सुरु झाले. अर्धी पायवाट चालून झाल्यावर मागे वळलो आणि दफनभूमीच्या दुसऱ्या कोपऱ्यात कोणीतरी बसल्याचा भास झाला. भीतीपोटी भास होत असल्याचा निश्चय मनाने केल्यानंतर ही भीती लगेचच दूर देखील झाली. एका थडग्यावर कोणीतरी बसल्यासारखे वाटले. आम्ही आणखी जवळ जाऊन चाचपणी केली असता, तिथे थडग्यावर नवी मार्बल बसवल्याचे दिसले. दूरवरच्या प्रकाशझोतामुळे ती चकाकल्याने हा भास होता, हे स्पष्ट झाले. प्रवेशद्वाराकडे परतत असताना पालापाचोळ््यात काहीतरी सरपटत गेल्याचा आवाज झाला. मात्र तेव्हा मनातील भीतीचे तिथेच करत दफन आम्ही आगेकूच केली़

अंतयात्रेला निर्धास्त निघालेली पावले एकातांत मात्र संथ होतात़ हा अनुभव घेण्यासाठी वरळी स्मशानभूमीत जाताना तेथील शिल्प आकर्षित करत होती़ हळूहळू चालताना झाडाचे पान खाली पडले व मनाला काहीक्षण विचलित करून गेले़ स्मशानात प्रवेश करताच तेथील सुरक्षा रक्षकाने कशासाठी येथे आलात असे विचारले़ आम्ही स्मशानातील फेरफटक्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर सुरक्षारक्षकही आमच्यासोबत आला़ प्रवेशद्वारापासून शंभर एक पावलांवर चितेचे चौथरे आहेत़ तेथे गेल्यानंतर सुरक्षारक्षकाचे अनुभव जाणून घेतले़ तेव्हा भयापेक्षा तेथे येणाऱ्या गुर्दुल्ले व बेवड्यांचा त्रास अधिकच असल्याचे त्याने कथन केले़ पाऊस असो वा थंडी आम्ही दोघेजण स्मशानाचा राऊंड घेतो़ आम्हाला कसलीही भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण कधीही चाहूल लागल्याचा अनुभव आला नसल्याचेही सुरक्षारक्षकाने सांगितले़ गेली पंचवीस वर्षे काम करणाऱ्या कामगारानेही येथे भयाचा अनुभव आला नसल्याचे ठासून सांगितले़ अगदी पहाटेपर्यंत येथे अंत्ययात्रा येतात़ मात्र चिता रचतानाही भय वाटले नाही. अमावस्या असो वा पौर्णिमा, भीती कधीही कामाच्या आड आली नाही़ पूर्वी अमावस्येला अंधश्रद्धेचे अनेक प्रकार येथे होत. आता त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचेही त्या कामगाराने सांगितले़़़ या अनुभवाने भीतीला कोठे तरी लांब नेऊन सोडले़

भीती हा एक असा शब्द आहे कि त्याने सगळ्यांच्याच मनात कुठेतरी घर केले आहे. मात्र काही केल्याने भीती मनातून जात नाही. अंधार...भूतप्रेत...याची भीती मनातून घालवण्यासाठी आम्ही मुंबईतील सर्वांत मोठ्या ख्रिश्चन दफनभूमी जवळ गेलो. या स्मशानभूमीची व्याप्ती काही एकरमध्ये असल्याने तेथील अंधराचा अंदाज बांधताना मनात अनेक विचार येत होते. दफनभूमीमागच्या गेटमधून प्रवेशाचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. तेवढ्यात या ख्रिस्ती दफनभूमीत मध्यरात्री प्रवेश मिळत नसल्याचे कळाले़ तरीही तेथे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा तेथील मेन गेटजवळील दोन सुरक्षा रक्षक झोपलेले दिसले आणि त्यांना उठवून प्रार्थनेसाठी आत प्रवेश करायचा असल्याचे आम्ही त्यांना सांगितले़ पण ते शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडे आम्ही विनवणी करत होतो़ मात्र आपल्या नोकरीचा प्रश्न आहे़ ही बाब कुणाला समजल्यास माझी नोकरी जाईल आणि माझी मुले रस्त्यावर येतील, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्याची कळकळीची विनंती ऐकताच आम्ही माघार घेतली़ पण विस्तीर्ण पसरलेल्या या दफनभूमी भोवतीच्या भीतीयुक्त वातावरणाचा अंदाज आम्ही घेतच होतो. तेव्हा मनात विचार आला की, अंधार...भीती...यामुळे अनेक जण स्मशानात जाण्यास घाबरतात. मात्र आपल्या मुलाबाळांंचे पोट भरण्यासाठी कुठल्याही भीतीची तमा न बाळगता ‘हा’ सुरक्षा रक्षक स्मशानाच्या सुरक्षेसाठी आपली जबाबदारी चोख बजावत आहे़़.

स्मशान म्हटले की, अनेकदा न पाहताही मनात घर केलेली भीती पुढे येते. स्मशानात पाऊल ठेवताना ‘स्मशानातील सोनं’या धड्याची आठवण मनात ताजी होते़ त्यामुळे मनात वेगवेगळ््या कल्पनाचे वादळ घोंघावत होते. शिवाजी पार्क येथील माई भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीत प्रवेश केला, तेव्हा तिथे शांतता होती आणि इतक्यातच मागून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला (अगदी हिंदी भयपटात रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा भुंकण्याच आवाज असतो तसाच)... पण काही होत नाही, असे म्हणूनच पुढे चालायला सुरूवात केली. स्मशानात कोणतीही हालचाल नव्हती. स्मशानात दिवे असल्यामुळे अंधाराची भीती वाटण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नव्हता. पण एकूणच वातावरण बाहेरच्या वातावरणापेक्षा काहीतरी वेगळे असल्याचे सारखे जाणवत होते. आत गेल्यावर तिथे एक धगधगती चिता दिसली. क्षणभर ‘त्या’ वातावरणात काहीशी वेगळीच भावना मनाला छेदून गेली; आणि काही क्षणातच अंतिम अवस्थेत जळत असलेल्या चितेच्या दिशेकडून गूढ आवाज आला. त्या आवाजाने काहीसे ‘धस्स...’ झालेही, मात्र त्याचवेळी तेथील सुरक्षारक्षकाने प्रेताची कवटी फुटल्याचा आवाज असल्याचे सांगितले. तिथेच उभे राहून परिसराचे निरीक्षण करत असताना तिथे ३ - ४ व्यक्ती आल्या आणि त्यांनी आम्हाला हटकले. यानंतरही स्मशानचे निरीक्षण करत तिथेच उभे असताना भयमुक्त झाल्याचीच जाणीव मनात निर्माण झाली. आणि नवीन वर्षाची सुरूवात ही एका वेगळ््या अनुभवाने आणि खंबीर मनाने झाली...

ही स्मशानभूमी महापालिका वसाहतीतच आहे़ याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू, ख्रिश्चन व मुस्लिम स्मशानभूमी एकाच रांगेत आहेत़ त्यामुळे आधी हिंदू स्मशानभूमीत आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी तेथे असलेल्या श्वानाने मोठा आवाज केला़ त्यामुळे तेथे झोपलेले सुरक्षारक्षक उठून बाहेर आले व त्यांनी आम्हाला तेथे येण्याचे उद्देश विचारला. येथे फेरफटका मारण्याचा हेतू असल्याचे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला तेथे प्रवेश दिला़ तेथील चौथाऱ्यावर चितेचा शेवट सुरू होता़ तेथून पुढे जाताना आम्ही सुरक्षारक्षकाशी चर्चा केली़ तेव्हा त्याने कोणतेही भय वाटत नसल्याचे सांगितले़

पुढे ख्रिश्चन दफनभूमीचे प्रवेशद्वारे बंद होते़ तर मुस्लिम दफनभूमीत प्रवेश नाकारण्यात आला़ आम्ही दुआ अदा करण्यासाठी आलो आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रवेश न मिळाल्याने अवघ्या काही फुटांवरुन आम्ही मध्यरात्री कब्रस्तानचा नजारा अनुभवला. स्मशानभूमींच्या या मोहिमेत भीती हरवून गेल्याच हा अनुभव होता.

Web Title: Resolve to be confused with ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.