कॉंग्रेस भवनला अंतुलेंचे नाव देण्याचा ठराव
By Admin | Updated: December 7, 2014 22:28 IST2014-12-07T22:28:00+5:302014-12-07T22:28:00+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचा कोकणच्या विकासात विशेष करुन रायगडच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.

कॉंग्रेस भवनला अंतुलेंचे नाव देण्याचा ठराव
अलिबाग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचा कोकणच्या विकासात विशेष करुन रायगडच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. अलिबाग येथे उभारण्यात आलेली काँग्रेस भवनची इमारत त्यांच्याच पुढाकारातून साकारलेली आहे. त्यामुळे काँग्रेस भुवनचे नामांतर बॅ. ए. आर. अंतुले भुवन करावे, असा ठराव काँग्रेस भुवनच्या ट्रस्टींनी नुकताच केला.
बॅ. अंतुले यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदाच्या कारकिर्दीत सर्वसमावेशक असे धडाडीचे निर्णय घेऊन ते अमलातही आणले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून अनेक योजनांचा जन्म झाला असून जनतेला डोळ््यासमोर ठेवूनच केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बेघरांसाठी इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, पल्स पोलिओ, त्याचप्रमाणे दळणवळण क्षेत्राचा विस्तार कोकणासह प्रामुख्याने रायगडमध्ये जास्त प्रमाणात केला. उद्योगाची गंगा रायगडात आणली. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग-थळ येथे असणारा आरसीएफचा खत प्रकल्प हा गुजरात राज्यात नेण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र बॅ. अंतुले यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी विविध पुलांची निर्मिती करुन जिल्ह्यातील अंतर कमी केले.
रायगडच्या राजकारणात त्यांनी काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवली होती. त्याचा फायदा सातत्याने पक्षाला झाला. काँग्रेस पक्षाला चांगले कार्यालय असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी अलिबाग येथील काँग्रेस भुवन ट्रस्टच्या मालकीच्या असणाऱ्या जागेवर सुसज्ज अशी इमारत उभारली. ती आज काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाते. काँग्रेस भुवन उभारल्याने रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध झाली.
सध्या या ट्रस्टवर रमेश नाईक आणि स्वत: अॅड.जे. टी. पाटील असे दोनच ट्रस्टी आहेत. त्यामध्ये आणखीन तीन ट्रस्टींना परवानगी मिळावी, असा रीतसर अर्ज सहायक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दिला असल्याचेही अॅड. पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)