सिडकोच्या कारवाईस ग्रामस्थांचा विरोध
By Admin | Updated: May 21, 2014 05:13 IST2014-05-21T05:13:37+5:302014-05-21T05:13:37+5:30
बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला ग्रामस्थांनी पिटाळून लावल्याचा प्रकार गोठीवली येथे घडला

सिडकोच्या कारवाईस ग्रामस्थांचा विरोध
नवी मुंबई : बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला ग्रामस्थांनी पिटाळून लावल्याचा प्रकार गोठीवली येथे घडला. कारवाईसाठी पथक तेथे आले असता प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून तेथे रस्ता अडवण्यात आला. त्यामुळे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई न करताच तेथून काढता पाय घेतला. मंगळवारी दुपारी गोठीवली गाव येथे हा प्रकार घडला. तेथील एका बेकरीवर कारवाईसाठी सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक गेले होते. ही बेकरी रस्त्यात अडथळा ठरत असल्याने तेथे ही कारवाई केली जाणार होती. परंतु सिडकोचे पथक गोठीवली गावात पोहचताच ग्रामस्थांनी त्यांना कारवाईसाठी विरोध केला. यावेळी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून गावाच्या मार्गावरच ठिय्या मांडण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रबाळे पोलिसांनी मध्यस्थी करुन सिडकोचे पथक आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांच्यात बैठक घडवली. त्यामध्ये ग्रामस्थांनी सिडकोला कारवाई करण्यास तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे कारवाई न करताच सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तेथून काढता पाय घेतला. या बेकरीला लागूनच प्रकल्पग्रस्तांची घरे देखील आहेत. त्यामुळे मंगळवारी बेकरीवर कारवाई करणार्या सिडकोने भविष्यात या घरांवर देखील कारवाईचे पाऊल उचलले असते. त्यामुळे सिडकोच्या कारवाईला विरोध करण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी सांगितले. तर सिडकोच्या अशा कारवाईविरोधात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिडकोविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)