खंडित वीजपुरवठ्यामुळे रहिवाशांचा उदे्रक
By Admin | Updated: January 15, 2015 22:50 IST2015-01-15T22:50:13+5:302015-01-15T22:50:13+5:30
तालुक्यातील उसर्ली, विचुंबे गावातील काही विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

खंडित वीजपुरवठ्यामुळे रहिवाशांचा उदे्रक
पनवेल : तालुक्यातील उसर्ली, विचुंबे गावातील काही विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. उसर्ली, विचुंबे गावातील घरकूल संकुल, राजे शिवाजी संकुल, ज्ञानेश्वर माऊली सोसायटी आदी सोसायटीमधील वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
काही सोसायट्यांमध्ये बोरिंगचे पाणी, नळाचे पाणी हे मोटरद्वारे टाकीत भरुन दिवसभर त्याचा पुरवठा इमारतीतील रहिवाशांना होत असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी बंद होते. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही वितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने वीज पुरवठा रात्रभर खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.
परिसरात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असून विजेचे बिल एक महिना भरले नाही तर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी त्वरित येतात, मात्र पुरवठा खंडित झाल्यावर कर्मचारी कधीच त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळेवर येत नसून काहीवेळा तर दोन - दोन दिवस काही विभागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विचुंबे, उसर्ली परिसरात वीज खंडित झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणाकडे जायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. नवीन पनवेल येथील कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार केल्यावर हा विभाग आमच्याकडे येत नाही, असे सांगून नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात तर भिंगारी सबस्टेशनमध्येही अशीच उत्तरे दिली जातात.