कळवा रुग्णालयाच्या हस्तांतरणास विरोध
By Admin | Updated: February 24, 2015 22:28 IST2015-02-24T22:28:27+5:302015-02-24T22:28:27+5:30
उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविता न आल्याने ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे

कळवा रुग्णालयाच्या हस्तांतरणास विरोध
ठाणे : उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविता न आल्याने ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारीका प्रशिक्षण संस्था शासनाने ताब्यात घेऊन चालवाव्यात अशा आशयाचा प्रस्ताव तयार केला आहे. परंतु दुसरीकडे याच बाबींसाठी २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकात २३ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. असे असले तरी देखील, आता या प्रस्तावाला सर्वसामान्य ठाणेकरांसह राजकीय पक्षांनी देखील विरोध दर्शविला आहे.
कळवा रुग्णालयात ५०० खाटांची सुविधा उपलब्ध असून येथे रोज ५०० च्या आसपास रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. परंतु सध्या या रुग्णालयासह राजीव गांधी वैद्यकीय रुग्णालयाची परिस्थिती फारच खालावली आहे. तसेच यासाठी १०३ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो करता येणे शक्य नसल्याचे मत पालिकेने व्यक्त केले आहे. त्यामुळे कळवा रुग्णालयासह, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, मीनाताई ठाकरे परिचारीका प्रशिक्षण संस्था आणि मौजे खारी येथील आरक्षण क्र. २ हॉस्पीटल हा आरक्षित भूखंड देखील शासनाने ताब्यात घ्यावा व तेथे रुग्णालय उभारावे ,असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. परंतु दुसरीकडे रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २३ कोटींची तरतूद केली आहे.
(प्रतिनिधी)