राजीनामा सत्र-पालिका त्रस्त
By Admin | Updated: December 28, 2014 00:42 IST2014-12-28T00:42:13+5:302014-12-28T00:42:13+5:30
मुंबई महापालिकेत गेल्या दोन वर्षांत ८० अभियंत्यांनी नोकरीला रामराम ठोकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़

राजीनामा सत्र-पालिका त्रस्त
मुंबई महापालिकेतील चित्र : दोन वर्षांत ८० अभियंत्यांचा नोकरीला रामराम
शेफाली परब-पंडित - मुंबई
सरकारी नोकरी आणि त्याबरोबर मिळणारे फायदे लक्षात घेता अनेक जणांचा कल हा सरकारी नोकरी मिळवण्याकडे असतो़ मात्र सरकारी कामातील पारदर्शीपणा आणि वाढता माहिती अधिकाराचा वापर पाहता आता सरकारी नोकरी नकोशी वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मुंबई महापालिकेत गेल्या दोन वर्षांत ८० अभियंत्यांनी नोकरीला रामराम ठोकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़
पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत विविध विभागांतील कनिष्ठ अभियंत्यांपासून प्रमुख अभियंत्यांनी नोकरीचा राजीनामा अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे़ पाणी खात्यापासून विकास नियोजनापर्यंत सर्व महत्त्वाच्या खात्यांचा कारभार अभियंता चालवितात़ मात्र पालिकेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभियंत्यांनी एकापाठोपाठ एक राजीनामा देण्याचा सपाटा लावल्यामुळे विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासन धास्तावले आहे़
याबाबत आकडेवारीच बोलकी आहे़ २०१२-२०१३ या काळात ४० तर २०१३-२०१४ या वर्षभरात ४५ अभियंत्यांनी पालिकेच्या नोकरीवर पाणी सोडले आहे़ पाणी व रस्ते खात्यामध्ये अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत़ तर दोन वर्षांमध्ये रस्ते विभागातील दोन प्रमुख अभियंत्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे़ सतीश बडवे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या नंतर या पदावर आलेले दत्तात्रय दीक्षित यांनीही स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली़ तर आणखी एका उपप्रमुख अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे स्वेच्छानिवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
राजीनाम्यांचे गौडबंगाल काय?
इमारत दुर्घटना, खड्ड््यात गेलेले रस्ते अशा प्रकरणात अभियंत्यांनाच सुळावर चढविण्यात आल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत घडल्या आहेत़ यामध्ये खड्डे बुजविले नाहीत तर अभियंते जबाबदार, बेकायदा बांधकाम वाढल्यास अभियंत्यांवर कारवाई अशी कठोर पावले प्रशासनाने उचलली आहेत़ चौकशीपूर्वीच निलंबनाची कारवाई होत असल्याने अभियंत्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका अभियंत्याने सांगितले़
अभियंत्यांवर झालेली कारवाई
दोन वर्षांपूर्वी माहीम येथील अफताब मंजिल दुर्घटनेत दहा जणांचा बळी गेला होता़ तर ६१ जणांचा बळी घेणाऱ्या डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडई दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांनाच जेलची हवा खावी लागली़ या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी मात्र नामानिराळे राहिले, याचा तीव्र संताप अभियंत्यांमध्ये आहे़ भायखळा येथील इमारत प्रस्ताव विभागात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वरिष्ठ पदावरील दोन अभियंत्यांना रंगेहाथ पकडले होते़ मात्र या प्रकरणानंतर या विभागातील सर्वच अभियंत्यांची तडकाफडकी बदली करून अभियंत्यांवर अविश्वास दाखविला गेल्याची खंत एका अभियंत्याने व्यक्त केली आहे़