Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 21:29 IST

वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायचे नाही.

ठळक मुद्देआपल्याला अन्य राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. न्या. धर्माधिकारी यांनी आपण राजीनामा दिल्याचे शुक्रवारी कोर्ट रूममध्ये सांगितले.

मुंबई - उच्च न्यायालयाचे द्वितीय ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आहे.  वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायचे नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे न्या. धर्माधिकारी यांनी म्हटले.

आपल्याला अन्य राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. पण आपल्याला मुंबई सोडायची नाही, असे न्या. धर्माधिकारी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले. मी केवळ वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणामुळे राजीनामा देत आहे. मला  मुंबई सोडून जायचे नाही आणि मला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यास तयार  नाहीत, असे न्या. धर्माधिकारी यांनी म्हटले. न्या. धर्माधिकारी यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला.  मात्र, अद्याप हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही, हे स्पष्ट झाले नाही.

न्या. धर्माधिकारी यांनी आपण राजीनामा दिल्याचे शुक्रवारी कोर्ट रूममध्ये सांगितले. अ‍ॅड. मॅथ्यू नेदुम्बरा यांनी एका याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याची विनंती न्या. धर्माधिकारी यांना केली असता त्यांनी आपण राजीनामा दिल्याचे भरलेल्या कोर्ट रुममध्ये सांगितले. 'मी ऑफीस सोडले आहे. आज माझा कामकाजाचा शेवटचा दिवस आहे,' असे धर्माधिकारी यांनी कोर्ट रुममध्ये म्हटले. 'सुरुवातीला मला ही मस्करी वाटली. ते ज्येष्ठ न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याने मला धक्का बसला,' असे नेदुंम्बरा यांनी सांगितले.

14 नोव्हेंबर 2003 रोजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळणार होती. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे उच्च न्यायालयात खळबळ माजली आहे.

टॅग्स :उच्च न्यायालयन्यायालयमुंबईराजीनामा