व्यावसायिकाच्या मुलाची जामिनावर सुटका
By Admin | Updated: December 21, 2015 01:54 IST2015-12-21T01:54:39+5:302015-12-21T01:54:39+5:30
भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्याला जखमी करणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलाची रविवारी जामिनावर सुटका करण्यात आली.

व्यावसायिकाच्या मुलाची जामिनावर सुटका
मुंबई: भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्याला जखमी करणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलाची रविवारी जामिनावर सुटका करण्यात आली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मधुबाई ढोलकीया यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील रहिवासी असलेला हा युवक केळकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास महाविद्यालयात सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी काका असलेले मनोहर भोईर यांची फोर्ड कार घेऊन तो निघाला. मनोहर हेदेखील व्यावसायिक आहेत. मुलुंड पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरून भरधाव वेगाने जात असताना, या युवकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात ढोलकीया गंभीर जखमी झाले. अपघातावेळी या युवकाने मद्यपान केलेले नसल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघातातील जखमी ढोलकीया सध्या मुलुंडच्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या युवकाला रविवारी अटक दाखवून, स्थानिक जामिनदाराच्या हमीपत्रावर त्याची सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)