Join us
Daily Top 2Weekly Top 5

२७५ इमारतींसह शेकडो चाळींना खार पूर्व उन्नत मार्गाचा फटका; आराखडा चुकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 11:38 IST

सांताक्रुझ, खारवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात.

मुंबई : खार पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या महापालिकेच्या प्रस्तावित उन्नत मार्गाला खार, सांताक्रूझ येथील रहिवाशांनी विरोध दर्शिवला आहे. या पुलाचा आरखडा चुकला असल्याने त्याचा मोठा फटका येथील २७५ रहिवाशी इमारती तसेच शेकडो चाळींना बसणार आहे. आपल्या राहत्या घरावर बुलडोझर फिरवला जाऊन बेघर होण्याच्या भीतीने रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत हा विरोध अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने खार पूर्व उन्नत मार्गाचे काम हाती घेतला आहे. दरवर्षी थोड्याशा पावसाने उपनगरात खार सबवेजवळ वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा परिणाम एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहुतकीवर होतो. तेव्हा खार सबवेची कोंडी फोडण्यासाठी पालिकेने खार पूर्व उन्नत मार्ग हाती घेतला आहे. 

८० वर्षांपासून वास्तव्य-

१) पालिकेने २४०० कोटी रुपयांचा बजेट करून चार भागांत उन्नत मार्ग बांधण्याचे निश्चित केले. 

२) मात्र, या उन्नत मार्गामुळे खार पूर्व ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत उभ्या असलेल्या जवळपास २७५ इमारती आणि गोळीबार, पटेल नगर, व्ही. एन. देसाई रुग्णालय, मराठा कॉलनी परिसरात गेल्या ८० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या झोपड्या, चाळी उद्ध्वस्त होणार आहेत. या मार्गाच्या रेखाटनात पालिकेने येथील इमारती आणि चाळींकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

३) विस्थापित होणाऱ्या रहिवाशांच्या घराचे काय होणार? त्यांना कुठे घर दिले जाणार? त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार? याबाबत पालिकेकडून स्पष्टता देण्यात  आलेली नाही.

मूळ रहिवाशांना स्थलांतरित केल्यास अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागेल. हा उन्नत मार्ग पर्यावरणदृष्ट्या आणि एकूणच खार सांताक्रूझ  रहिवाशांसाठी कोणत्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सांताक्रुझ पूर्व रेसिडेंट असोसिएशनचा या प्रकल्पाला विरोध आहे. सर्वमताने पुढील काही दिवसांत आम्ही आमची भूमिका अधिक स्पष्ट करणार आहे.- परेश व्होरा, खजिनदार, सांताक्रुझ पूर्व रेसिडेंट असोसिएशन.

खार सबवे उन्नत मार्गामुळे गोळीबार, पटेलनगर, मराठा कॉलनीमधील काही रहिवाशांना आपले घर सोडावे लागणार आहे. दोन ते तीन कुटुंब एकत्र चाळीतील घरात राहतात. त्यांचे पुनर्वसन केल्यास अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. मुलांच्या शाळा, आरोग्य असे अनेक प्रश्न आहेत. घरे तोडल्यास झोपडपट्टीधारक रस्त्यावर येतील. त्यामुळे आमचा उन्नत मार्गाला विरोध आहे.- विनोद रावत, अध्यक्ष, आपले घर प्रतिष्ठान

टॅग्स :मुंबईनगर पालिका