रेवदंडा गावात कच-यामुळे रोगराईची नागरिकांना भीती
By Admin | Updated: October 14, 2014 22:51 IST2014-10-14T22:51:59+5:302014-10-14T22:51:59+5:30
स्वच्छतेचा नारा देशभर दिला जात असला तरी, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायतीला मात्र स्वच्छतेचे महत्त्व पटलेले दिसत नाही.

रेवदंडा गावात कच-यामुळे रोगराईची नागरिकांना भीती
बोर्ली-मांडला : स्वच्छतेचा नारा देशभर दिला जात असला तरी, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायतीला मात्र स्वच्छतेचे महत्त्व पटलेले दिसत नाही. रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांसहित येणाऱ्या - जाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत असा लौकिक असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत परिसरातील चौलचौकी ते रेवदंडा बाह्य वळणावरील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर उघड्यावर कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी भाजीविक्रेते, चिकन - मटण विक्रेते रोज आपल्या येथील कचरा आणून येथे टाकतात, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांसहित पादचारी, वाहन चालकांना येथून जाताना नाक धरूनच जावे लागत आहे. याचा सर्वात जास्त त्रास विद्यार्थ्यांना होतो.
ग्रामपंचायतीची घंटागाडी ही कचरा गोळा करण्यासाठी संपूर्ण गावातून फिरत असताना व्यावसायिक अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे येथे जमणारे श्वान येथून येणाऱ्या - जाणाऱ्या दुचाकी वाहनचालक किंवा पादचाऱ्यांच्या पाठीशी लागत आहेत. (वार्ताहर)