मुंबई : एकीकडे महापालिकेने मोडकळीस आलेली इमारत रिकामी करण्यासाठी बजावलेली नोटीस आणि दुसरीकडे चाळीच्या पुनर्विकासात होणारी चालढकल या कात्रीत बोरीवलीतील म्हातारपाखाडी परिसरातील साई निवास इमारतीतील २७ रहिवासी सापडले आहेत. खासदार गोपाळ शेट्टी यांनी या रहिवाशांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.एक्सर गावातील म्हातारपाखाडी भागातील या जागेत १९८४ साली साई निवास चाळीचे १२ रूम बांधण्यात आले. १९९३ साली त्यावर पहिल्या मजल्यावर आणखी रूम बांधण्यात आल्याने एकूण रूमची संख्या २७ झाली. वरच्या मजल्यावरही भाडेकरू राहू लागले.चाळीचा देखभाल खर्च रहिवासी करतात आणि महापालिकेचा मालमत्ता करही रहिवाशांकडूनच भरला जातो.२0१२ साली वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बिल्डरसोबत जागामालक इन्गेनिया मेंडोंसा यांनी कन्व्हेयन्स करार केला. तेव्हापासून चाळीत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले. बिल्डरने चाळीचा स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट महापालिकेला सादर केला. चाळ मोडकळीस आल्याने ती तातडीने दुरुस्त करण्याची सूचना या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. चाळ मोडकळीस आल्याने आणि धोकादायक स्थितीत असल्याने महापालिकेने ३५४ अन्वये चाळ रिकामी करण्याबाबत रहिवाशांना नोटीस जारी केली आहे.आजमितीस महापालिका या नोटिशीचा पाठपुरावा करीत चाळ रिकामी करण्यासाठी रहिवाशांमागे तगादा लावत आहे. पुनर्विकासासाठी आम्ही तयार आहोत. मात्र बिल्डरकडून तोंडी मिळत असलेली जागा कमी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिका आणि बिल्डरच्या कात्रीत सापडलेल्या रहिवाशांचा प्रश्न आता खासदार गोपाळ शेट्टी यांनी हाती घेतला आहे.याबाबत भाजपाच्या बोरीवली विधानसभा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रेश्मा निवळे म्हणाल्या की, बिल्डरने जागा मालकाकडून जागा घेतली आहे. महापालिका रहिवाशांना बाहेर काढू पाहत आहे. बिल्डर जबाबदारी घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत रहिवाशांनी जायचे कोठे? आम्ही हवालदिल रहिवाशांच्या पाठीशी असून, त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देऊ. पात्र - अपात्र रहिवाशांचा तिढा मिटवून पुनर्विकास केला जाऊ शकतो. नियमानुसार प्रत्येक रहिवाशाला किमान ३00 चौ. फूट जागा मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू.>वास इन्फ्रास्टक्चर लिमिटेडचे जयेश वालिया यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, इमारतीची अवस्था अतिशय वाईट आहे. या भागाचा लेआउट दुसºया बिल्डरने केला आहे. त्यात साई निवास इमारत असलेल्या जागेसाठी प्रवेश मार्ग नाही. तो मार्ग मिळेपर्यंत महापालिका स्तरावर पुनर्विकासाला परवानगी मिळणार नाही. अतिरिक्त जागा देण्याचा प्रश्न त्यानंतरचा आहे.>महापालिकेचे काही अधिकारी बिल्डरांशी हातमिळवणी करून रहिवाशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार आम्ही सहन करणार नाही. नियमानुसार त्यांना जी जागा मिळावयास हवी, त्यापेक्षा एक फूटही कमी घेतली जाणार नाही. पुनर्विकास होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.- खासदार गोपाळ शेट्टी
महापालिका-बिल्डरच्या कात्रीत अडकले रहिवासी, चाळ रिकामी करण्यासाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:34 IST