इमारतींच्या दुरवस्थेला रहिवासीच जबाबदार

By Admin | Updated: August 10, 2014 23:52 IST2014-08-10T23:52:24+5:302014-08-10T23:52:24+5:30

सिडकोने बांधलेल्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. अनेकांची पडझड सुरू झाल्याने या इमारती राहण्याच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत.

Residents are responsible for the disturbance of buildings | इमारतींच्या दुरवस्थेला रहिवासीच जबाबदार

इमारतींच्या दुरवस्थेला रहिवासीच जबाबदार

नवी मुंबई: सिडकोने बांधलेल्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. अनेकांची पडझड सुरू झाल्याने या इमारती राहण्याच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत. इमारतींच्या या अवस्थेला तेथील रहिवासी जबाबदार असल्याचा पलटवार सिडकोने केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात सिडकोने बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. भिंतींना भेगा पडल्या आहेत. जिन्याचे व छताचे प्लास्टर निखळण्याच्या घटना तर नेहमीच्याच झाल्या आहेत. काही इमारतींच्या सिलिंगचे स्टीलसुध्दा उघडे पडले आहे. आतापर्यंत घडलेल्या अशा दुर्घटनांत अनेक जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे असले तरी इमारतींची अवस्था पाहता भविष्यात ती नाकारताही येत नाही. या इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सिडको व नगरविकास खाते फारसे गंभीर नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास त्याला सिडको व नगरविकास खात्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर सागर नाईक यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिल्या होत्या. तसेच यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरिता एक समिती गठीत करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. महापालिकेच्या या भूमिकेचा समाचार घेत सिडकोने या इमारतींच्या दुरवस्थेस तेथील सदनिकाधारकच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी या इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मिराणी समितीचा हवाला सिडकोने दिला आहे.
दरम्यान, इमारतींच्या दुरवस्थेस सदनिकाधारकच जबाबदार असल्याच्या सिडकोच्या म्हणण्यावर रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सदनिकाधारकांनी वेळोवेळी या इमारतींची डागडुजी केली आहे. त्यानंतरही पडझड सुरूच आहे. मुळात सिडकोने केलेले बांधकामच निकृष्ट ठरल्याने या दुर्घटना घडत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापौर सागर नाईक यांनीही सिडकोच्या या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. सिडकोच्या निकृष्ट बांधकामांविषयी नेहमीच चर्चा होते. जुन्या इमारती सोडाच परंतु दहा वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतींचीही पडझड सुरू झाली आहे. असे असताना येथील इमारतींच्या दुरवस्थेस सदनिकाधारकांनाच जबाबदार धरण्याची सिडकोची भूमिका संभ्रमात टाकणारी असल्याचे महापौर सागर नाईक यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Residents are responsible for the disturbance of buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.