निवासी डॉक्टरांचा आज बहिष्कार !
By Admin | Updated: November 26, 2015 02:52 IST2015-11-26T02:52:48+5:302015-11-26T02:52:48+5:30
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टरर्स (मार्ड) संघटनेला सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे गुरुवारी राज्यातील सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात

निवासी डॉक्टरांचा आज बहिष्कार !
मुंबई : महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टरर्स (मार्ड) संघटनेला सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे गुरुवारी राज्यातील सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) निवासी डॉक्टर काम करणार नाहीत. पण, रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, म्हणून आपत्कालीन यंत्रणा सुरु राहणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी सकाळी १० वाजता चर्चा करण्यात येणार आहे, त्यानंतर आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मार्डच्यावतीने सांगण्यात आले.
नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्व पदवी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सतत तीन दिवस गंभीर स्वरुपाच्या तक्रारी येऊनही रुग्णालयाने याची गंभीर दखल घेतलेली नाही. आत्तापर्यंत डॉ. व्यवहारे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याचबरोबर मार्डच्या ६ मागण्या सरकारने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. म्हणूनच मार्डने संप करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून गुरुवारी सकाळी फक्त बाह्यरुग्ण विभागच बंद ठेवण्यात येणार आहेत, मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ड संघटना प्रमुख मागण्यांविषयी सांगणार आहेत. ही चर्चा सकारात्मक झाल्यास संप करणार नाही. पण, उद्या होणाऱ्या चर्चेत कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास निवासी डॉक्टर बेमुदत संप पुकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)