निवासी डॉक्टरला पुन्हा मारहाण

By Admin | Updated: May 14, 2015 01:08 IST2015-05-14T01:08:39+5:302015-05-14T01:08:39+5:30

गेल्या २० दिवसांत तीन निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला

Resident doctor assaulted again | निवासी डॉक्टरला पुन्हा मारहाण

निवासी डॉक्टरला पुन्हा मारहाण

मुंबई : गेल्या २० दिवसांत तीन निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. तरीही सरकार निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने मार्ड संघटनेने राज्यव्यापी मासबंक करण्याचा इशारा दिला आहे.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात डॉ. मनीष हा वैद्यकीय चिकित्सा विभागात शिकत आहे. १२ मे रोजी वॉर्डमधल्या एका रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. २० दिवसांतली ही तिसरी घटना आहे. सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्यावर निवासी डॉक्टरांना सुरक्षा द्या, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाची सरकार आणि संचालनालयाने कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे नांदेड प्रकरणानंतर पुन्हा एकदा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांना सेंट्रल मार्डने पत्र लिहिल्याची माहिती मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमीत लोमटे यांनी दिली.
डॉ. लोमटे यांनी पुढे असे सांगितले, सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यावर आम्ही संचालनालयाला पत्र लिहिले होते. यानंतर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागत आहोत. पण अजूनही त्यांनी आम्हाला वेळ दिलेली नाही. निवासी डॉक्टरांनी मासबंक केल्यास त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो. यामुळे मार्डला चर्चा करून प्रश्नांवर तोडगा काढायचा आहे. नांदेडमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण होऊनही आपत्कालीन रुग्णसेवेवर परिणाम होऊ दिला नाही. नांदेड येथील मार्डच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यस्तरीय मासबंक करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Resident doctor assaulted again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.