Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीस दलात फेरबदल; पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 04:15 IST

पोर्ट परिमंडळाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची मुंबईच्या सायबर उपायुक्तपदी नियुक्ती केली असून विशेष शाखा एकचे उपायुक्त गणेश शिंदे हे पोर्ट परिमंडळाचे नवे उपायुक्त आहेत

मुंबई : मुंबई पोलीस दलात फेरबदलाचे वारे वाहू लागले असून गुरुवारी पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात दोन अधिकाऱ्यांना केंद्रात नियुक्त्यांवर कार्यमुक्त करण्यात आले.

यापूर्वी परिमंडळ सातमध्ये असलेले पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांची मुंबईबाहेर आणि सहायक महानिरीक्षक म्हणून कार्यभार पाहत असलेल्या पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची पुन्हा मुंबईत नियुक्ती करण्यात आली. त्रिमुखे यांच्या खांद्यावर परिमंडळ नऊची जबाबदारी सोपविण्यात आली. यातूनच मुंबईत मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळाले होते. त्यानुसार गुरूवारी परिमंडळ ८ ची जबाबदारी असलेल्या पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांच्याकडे आता दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या परिमंडळ एकची जबाबदारी दिली आहे.

परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांची मुंबई पोलीस मुख्यालयात आॅपरेशनचे उपायुक्त म्हणून बदली केली आहे. तर, संरक्षण विभागाचे उपायुक्त प्रशांत कदम यांची परिमंडळ सातच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नियती ठाकेर-दवे यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी आॅपरेशनचे उपायुक्त प्रणय अशोक यांची नेमणूक झाली. परिमंडळ तीनचे उपायुक्त अभिनाशकुमार यांचीही केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांची नियुक्ती केली आहे. एन. अंबिका यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी सशस्त्र पोलीस बल ताडदेवचे उपायुक्त नंदकुमार ठाकुर यांची नेमणूक केली.

पोर्ट परिमंडळाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची मुंबईच्या सायबर उपायुक्तपदी नियुक्ती केली असून विशेष शाखा एकचे उपायुक्त गणेश शिंदे हे पोर्ट परिमंडळाचे नवे उपायुक्त आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांची विशेष शाखा एकचे उपायुक्त म्हणून बदली केली असून परिमंडळ अकराचे उपायुक्त डॉ. मोहन दहिकर यांना पुन्हा एकादा गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची नियुक्ती झाली.

टॅग्स :मुंबई पोलीस