आरक्षित भूखंडाचा श्वास कोंडला
By Admin | Updated: May 15, 2014 00:09 IST2014-05-15T00:09:16+5:302014-05-15T00:09:16+5:30
अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या आणि सर्कस मैदान या नावाने ओळखल्या जाणार्या भुखंडाला चारही बाजूने झोपड्यांचा विळखा पडल्याने त्याचा श्वास कोंडला आहे.
आरक्षित भूखंडाचा श्वास कोंडला
पंकज पाटील, अंबरनाथ - अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या आणि सर्कस मैदान या नावाने ओळखल्या जाणार्या भुखंडाला चारही बाजूने झोपड्यांचा विळखा पडल्याने त्याचा श्वास कोंडला आहे. तसेच या भूखंडावर आता भूमाफियांचे अतिक्रमण होत असून तो मोकळा करण्यासाठी पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे भविष्यात त्यावरील अनधिकृत बांधकामे पालिकेची डोकेदुखी ठरणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सर्कस मैदानाचा परिसर हा तीन एकरपेक्षा जास्त आहे. या मोक्याच्या भूखंडावर पालिकेने खेळाचे मैदान, मार्केट आणि व्यापारी संकुल असे महत्त्वाचे आरक्षण टाकले आहे. भविष्यात या जागेवरील एखादे आरक्षण कमी करुन तेथे बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. पालिकेच्या ताब्यातील सर्वात मोठ्या आणि मोक्याच्या जागेवर असलेल्या या भूखंडाच्या एका बाजूला भाजी मंडई, दुसर्या बाजूला रेल्वे स्थानक, तिसर्या बाजूला पोलीस ठाणे आणि चौथ्या बाजूला डीएमसी कंपनीची जागा आहे. पालिका मुख्यालयापासून हा भूखंड अवघ्या २०० मीटरच्या अंतरावर असतानाही त्यावर होणार्या अतिक्रमणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या त्याच्या चारही बाजूला अनधिकृत झोपड्या आहेत. या झोपड्यांवर कारवाई होत नाही, हे लक्षात घेऊन काही भूमाफियांनी थेट त्या भूखंडावरच अनधिकृत बांधकामे सुरु केली आहेत.