‘निपाह’साठी पालिका रुग्णालयात राखीव खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:30 IST2018-06-03T02:30:39+5:302018-06-03T02:30:39+5:30
केरळमधून परसत असलेला निपाह हा आजार गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

‘निपाह’साठी पालिका रुग्णालयात राखीव खाटा
मुंबई : केरळमधून परसत असलेला निपाह हा आजार गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे, मुंबई शहराच्या आरोग्याचा विचार करता पालिका प्रशासनाने जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर व कस्तुरबा रुग्णालयात राखीव खाटा असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
निपाह हा आजार जीवघेणा असून, त्यापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. वटवाघळांपासून या आजारांच्या विषाणूंचे संक्रमण होत आहे. या आजाराविषयी खबरदारी घेताना कस्तुरबा गांधी रुग्णालयात सध्या एक आयसोलेशन वॉर्ड करण्यात आला आहे. मुंबई शहर-उपनगरात कुठलाही संशयित किंवा बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर या वॉर्डमध्ये उपचार करण्यात येतील. या रुग्णालयातील प्रशिक्षित डॉक्टर्स आणि परिचारिका या रुग्णांच्या चाचण्या करून त्यावर उपचार करतील, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने ‘लोकमत’ला दिली.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले, कस्तुरबाप्रमाणेच जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटरमध्येही अशाच प्रकारचे काही वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे याविषयी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेला याविषयी दक्ष राहण्याची सूचना देण्यात आली आहे. डुक्कर, वटवाघूळ आणि दूषित फळांमधून हा आजार पसरत असल्याने यापुढे फळे खाताना काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अनेकदा रात्रीच्या वेळी फिरणारी वटवाघळे झाडाला लागलेली फळे अर्धवट खाऊन सोडून देतात. अशी फळे खाल्ल्यामुळे निपाहची लागण होऊ शकते.
लस उपलब्ध नाही
- वटवाघळाची विष्टा, लाळ किंवा लघवी फळाच्या संपर्कात येते. असे फळ खाल्यास मानवाला किंवा डुक्कर, घोडा यांना निपाह होतो. केरळमध्ये डुकराच्या माध्यमातून मानवाला हा आजार झाला आहे.
- यावर कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. रोगसर्वेक्षण करून सुरक्षेच्या उपाययोजना करणे हाच उपाय असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
काय काळजी घ्याल?
- झाडावरून पडलेली आणि खूप पिकलेली फळे खाऊ नका
- या आजाराने पीडित व्यक्तींच्या जवळ जाऊ नका
- खूप ताप येत असल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या.
लक्षणे
३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी, अंगदुखीसह २४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो. न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते, अशा प्रकारची लक्षणे
दिसून येतात.