रेल्वेचे आरक्षित तिकीट एजंटांच्या हाती
By Admin | Updated: September 14, 2014 23:56 IST2014-09-14T22:33:16+5:302014-09-14T23:56:36+5:30
खासगीकरणाचा निर्णय : यात्री तिकीट विक्री सुविधा केंद्र योजना सुरू

रेल्वेचे आरक्षित तिकीट एजंटांच्या हाती
सदानंद औंधे - मिरज रेल्वेच्या आरक्षित तिकीट विक्रीचे खासगीकरण करण्यात आले आहे. यात्री तिकीट विक्री सुविधा केंद्र तत्काळ व आरक्षित तिकिटे खासगी एजंटांकडून विक्रीची योजना सुरू करण्यात आली आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आरक्षित तिकीट विक्री एजंटांच्या हाती देण्याचा प्रयोग केला आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. तीन महिने अगोदर मिळणारी आरक्षित तिकिटे व एक दिवस अगोदर मिळणाऱ्या तत्काळ तिकिटांसाठी तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी असते. आरक्षित रेल्वे तिकीट मिळविणे मोठी कसरत ठरत असल्याने, तिकिटे मिळवून देणाऱ्या एजंटांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रवाशांच्या ओळखपत्राची सक्ती, ठराविक वेळेतच तत्काळ तिकिटांचे वाटप, तिकीट काढणाऱ्यांच्याही ओळखपत्राची सक्ती, एजंटांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा पथके आदी विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, रेल्वेने आता धोरणात बदल केला आहे. सात वर्षांपूर्वी अनारक्षित तिकिटे विक्रीसाठी जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक या नावाने एजंट नियुक्त करण्यात आले. आता अनारक्षित तिकिटांप्रमाणे आरक्षित व तत्काळ तिकिटे विक्रीचेही खासगीकरण करून, यापूर्वी नियुक्त केलेल्या तिकीट बुकिंग सेवकांमार्फत आरक्षित तिकिटांची विक्री होणार आहे. ५ लाख रुपये विनापरतावा अनामत घेऊन रेल्वे स्थानक परिसरात यात्री तिकीट सुविधा केंद्र खासगी एजंटांना देण्यात येणार आहेत. दरवर्षी पाच हजार रुपये परवाना फी व दोन लाखाची बँक गँरंटी घेऊन तीन वर्षांचा आरक्षित तिकीट विक्री परवाना मिळणार आहे. आरक्षित तिकीट विक्री करणाऱ्या एजन्सीधारकास द्वितीय श्रेणी, स्लिपर तिकिटासाठी ३० रुपये व इतर उच्च श्रेणीच्या तिकिटासाठी ४० रुपये कमिशन देण्यात येणार आहे. तिकिटे विक्रीसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा करातील ५० टक्के व तिकीट रद्द करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कातील ५० टक्के रक्कम एजन्सीधारकांना मिळणार आहे. हे कमिशन अर्थातच प्रवाशांकडून वसूल होणार आहे. यात्री सुविधा केंद्राद्वारे आरक्षित तिकिटांसाठी रेल्वेच्या तिकीट विक्री खिडकीवर होणारी झुंबड कमी होणार असली तरी, एजंटांकडूनआरक्षित तिकिटांचा काळाबाजार वाढणार असल्याचीही भीती आहे. काळाबाजार रोखण्यासाठी यात्री सुविधा तिकीट केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था व रेल्वे अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या तिकीट विक्री खासगीकरणाचा फायदा प्रवाशांना मिळणार की एजंटांना, हे योजना सुरू झाल्यानंतरच समजणार आहे.