मुंबई : बहुजन समाजातील अनुसूचित जाती व जमातींमधील शासकीय कर्मचा-यांच्या पदोन्नती आरक्षणाचे संरक्षण करा आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बहुजन क्रांती दलाने सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात मोर्चाची हाक दिली आहे. क्रांती दलाचे अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राठोड म्हणाले की, देशातील बहुजनांचे आरक्षण धोक्यात आले आहे. सरकारने चांगले वकील दिल्यास पदोन्नती आरक्षणावरीलस्थगिती तत्काळ उठू शकते. त्यामुळे झोपलेल्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी सोमवारी मोर्चाचे आयोजन केले आहे.याशिवाय बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची क्रांती दलाची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी घटनात्मक आरक्षण मिळावे, म्हणून मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी. कारण अनुसूचित जमातीसाठी घटनेमध्ये नमूद केलेले ५ निकष हे बंजारा समाज पूर्ण करतो.म्हणूनच अनुसूचित जमातीच्या संविधानिक सवलती मिळण्यासाठी, बंजारा समाजाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची गरज आहे, तेव्हाच बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळेल. याचाच सारासार विचार करून, राज्य सरकारविरोधात सोमवारच्या मोर्चात बहुजन समाजातील १० हजार लोकआपला रोष व्यक्त करतील ,असेही ते म्हणाले.>निवडणूक लढवणारपदोन्नती आरक्षण आणि वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाबाबत राज्य सरकारची उदासीन भूमिका पाहता, बहुजन समाजात तीव्र नाराजी आहे. त्यात राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले बंजारा समाजाचे नेते उच्च पदावर असतानाही, समाजाच्या विकासाबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. म्हणूनच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत क्रांती दलाचे पदाधिकारी निवडणुका लढवणार असल्याची माहिती, क्रांती दलाचे कोषाध्यक्ष बाबुराव पवार यांनी दिली.
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या, सोमवारी आझाद मैदानात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:58 IST