वाशीत बसमध्ये ओलीस ठेवलेल्यांची सुटका
By Admin | Updated: March 16, 2015 01:45 IST2015-03-16T01:45:50+5:302015-03-16T01:45:50+5:30
खासगी बसमधील प्रवाशांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे...असा फोन खणाणला आणि शीघ्र कृती दलाने वाशीतील इनॉर्बिट मॉलकडे कूच केली.

वाशीत बसमध्ये ओलीस ठेवलेल्यांची सुटका
नवी मुंबई : खासगी बसमधील प्रवाशांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे...असा फोन खणाणला आणि शीघ्र कृती दलाने वाशीतील इनॉर्बिट मॉलकडे कूच केली. ओलीसांच्या सुटकेसाठी झालेल्या थरार नाट्याने रविवारी दुपारी या परिसर थबकला होता. मात्र क्युआरटीच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने ओलीसांच्या सुटकेची मोहीम फत्ते केली आणि अखेर ते प्रात्यक्षिक असल्याचे समजताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
वाशीतील इनॉर्बिट मॉलच्या आवारात उभ्या असलेल्या बसमध्ये चार प्रवाशांना काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. त्यानुसार नागरिकांची सुटका करण्यासाठी क्युआरटी (शीघ्र कृती दल) तेथे दाखल झाले. हातामध्ये एके-४७ व पिस्तूल घेऊन तेथे आलेली क्युआरटीची तुकडी पाहून नागरिकही संभ्रमात पडले. तर बसमध्ये दहशतवादी असून त्यांचा खात्मा करण्यासाठी हा थरार चालल्याचे समजताच अनेकांना घामही फुटला. थोड्याच वेळात बेसमेंटच्या पार्किंगमधून २५ ते ३० जवानांची एक तुकडी बसच्या दिशेने बंदुकीचा निशाणा साधून उभी राहिली. त्यांचे पुढचे पाऊल काय असेल हे कळायच्या अगोदरच त्यापैकी एकाने बसभोवती फिरणाऱ्या एका दहशतवाद्यावर झडप घालून त्याचा खात्मा केला. संधी साधून क्युआरटीच्या संपूर्ण तुकडीने कौशल्याने बसला घेरून खिडकीतून बंदुका ताणून दहशतवाद्यांना निशाण्यावर घेतले. त्यानंतर काही मिनिटांतच क्युआरटीच्या तुकडीने नाट्यमयरीत्या एक - एक करून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालून ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. शीघ्र कृती दलाचा हा थरार सुरू असतानाच परिसरातील नागरिकही भारावून गेले होते. प्रत्येक क्षणाला पुढे काय होईल याची उत्सुकता त्यांना लागलेली. अखेर हे बचावकार्य एक प्रात्यक्षिक असल्याची सूचना पोलिसांकडून होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दहशतवाद विरोधी सप्ताह अंतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे, क्युआरटी तुकडी प्रमुख सहाय्यक निरीक्षक के. एस. शालीग्राम यांच्यासह सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)