Join us

“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका

By मनीषा म्हात्रे | Updated: May 14, 2024 05:47 IST

अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पेट्रोल भरून पैसे देणार तोच अचानक अंगावर काही तरी कोसळले. नेमके काय झाले क्षणभर समजले नाही, अशी आपबिती जखमी व्यक्तीने सांगितली.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वादळी वाऱ्यामुळे आधीच पती घरी कधी येणार याकडे लक्ष लागले होते. त्यातच जोराचा आवाज झाला आणि सगळीकडे धुरळा पसरला. क्षणभर काय झाले, हे समजण्याच्या आतच पतीचा फोन खणखणला.  “मुझे बचाव मैं शेड के नीचे फस गया हूँ” असा पतीचा कॉल आला. त्यांच्या दिशेने धाव घेतली. आजूबाजूच्या मुलांनीही मदतीसाठी धाव घेतली. अखेर, चार तासांच्या थरारानंतर पतीला बाहेर काढल्याचे चंदा गुप्ता यांनी सांगितले. त्यांच्या पतीचे नाव अशोक गुप्ता आहे. 

रमाबाई नगर परिसरात गुप्ता कुटुंबीय राहतात. गुप्ता हे ९० फूट रोड परिसरात गॅरेजचे काम करतात. सायंकाळी दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी ते पंपावर आले. गुप्ता म्हणाले, अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पेट्रोल भरून पैसे देणार तोच अचानक अंगावर काही तरी कोसळले. नेमके काय झाले क्षणभर समजले नाही. अंधार आणि दुचाकी मशीनच्या आडोशामुळे एक हात रिकामा होता. मी पत्नीला कॉल करून मदत मागितली. 

नेमके काय करायचे समजत नव्हते. डोळ्यापुढे फक्त अंधारी होती. पत्नी, मुलगा आणि मुलगी सर्वांना कॉल केल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने आजूबाजूला मदतीसाठी आवाज आला. मी आतून आवाज देत होतो, मात्र माझ्यापर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. त्याचवेळी कोणीतरी पत्रा वाजवला. मोबाइलची टॉर्चची लाइट दाखवली. त्यानंतर शुद्ध हरपली, थेट रुग्णालयात जाग आल्याचे त्यांनी म्हटले. पत्नी चंदा यांनी सांगितले, पतीच्या कॉलने धक्का बसला. “मुझे बचाव, मुझे बचाव” हे शब्द फक्त कानावर होते. 

आधार हरपला...

घाटकोपरच्या गोळीबार रोड परिसरात राहणाऱ्या भरत राठोड या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला. भरत हा नोकरी करायचा. सोमवारी तो पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला. पाऊस लागल्याने तेथेच आडोसा घेत थांबला. अचानक होर्डिंग्ज कोसळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या निधनाने आधार हरपल्याचे सांगत कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.  

टॅग्स :मुंबईपाऊस