Join us  

मुंबई अग्निशमन दलाचे सक्षमीकरण, ९१० जवानांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 10:01 AM

२५० अधिक महिलांचाही समावेश : पहिल्या टप्प्यात ४५९ जवान रुजू.

मुंबई : गेल्या सात ते आठ वर्षांनंतर मुंबई अग्निशमन दलात तब्बल ९१० जवानांची भरती केली आहे. त्यात २५० हून अधिक महिला जवान आहेत. पहिल्या टप्प्यात ४५९ जवान कर्तव्यावर रुजू झाले असून, उर्वरित जवान लवकरच सेवेत दाखल होतील, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अधिकच्या जवानांमुळे अग्निशमन दलाचे सक्षमीकरण झाले आहे.

आग लागली, झाडावर पक्षी अडकला, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळला, तर पहिला फोन खणखणतो तो अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमचा. अग्निशमन दलात सद्य:स्थितीत अधिकारी व जवान असे २५०० जण सेवा बजावत आहेत. परंतु, आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना अग्निशमन दलातील जवानांची संख्या अपुरी पडू लागली. त्यामुळे गेल्या वर्षी अग्निशमन दलात जवानांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून, तसेच अन्य राज्यांतूनही लाखोंपेक्षा इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. यातून अग्निशमन दलात ९१० उमेदवारांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५५५ उमेदवारांची निवड केली. त्यांना ५ जुलै २०२३ पासून प्रशिक्षणासाठी अग्निशमन दलाच्या वडाळा, मानखुर्द, बोरिवली आणि विक्रोळी येथे प्रशिक्षण केंद्रात पाठविले आहे. 

आणखी ३५५ जवान  लवकरच सेवेत-

उमेदवारांचे प्रशिक्षण ५ जानेवारी २०२४ रोजीपर्यंत होते. प्रशिक्षणात ५५५ पैकी ४५९ उमेदवार पास झाले. जे प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाले त्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणात वाढीव प्रशिक्षण देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ पासून दुसऱ्या टप्प्यातील ३५५ उमेदवारांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. येत्या मे २०२४ मध्ये प्रशिक्षण संपणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना कामावर घेण्यात येणार आहे.

अशी आहेत पदे-

माजी सैनिक                           १३६ 

खेळाडू                                   ४६

प्रकल्पग्रस्त                            ४६

भूकंपग्रस्त                             १७

महिला                                 २७३

सर्वसाधारण आरक्षण            ३९२

अनाथ                                  ९

अपंग                                  ३७

पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या ४५९ पुरुष आणि महिला उमेदवारांना २३ जानेवारी २०२४ पासून अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना अग्निशमन दलाच्या ३५ फायर स्टेशन आणि कंट्रोल रूममध्ये तैनात केले आहे - रवींद्र आंबुलगेकर, अग्निशमन दल प्रमुख, मुंबई

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअग्निशमन दल