माझगाव संकुलात पाण्यासाठी वणवण
By Admin | Updated: October 23, 2014 02:02 IST2014-10-23T02:02:49+5:302014-10-23T02:02:49+5:30
गिरणी कामगार आणि म्हाडाच्या संक्रमण शिबिरांसाठी बांधलेल्या फेरबंदर येथील माझगाव संकुलात ऐन दिवाळीत पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण सुरू आहे.

माझगाव संकुलात पाण्यासाठी वणवण
मुंबई : गिरणी कामगार आणि म्हाडाच्या संक्रमण शिबिरांसाठी बांधलेल्या फेरबंदर येथील माझगाव संकुलात ऐन दिवाळीत पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण सुरू आहे. शिवाय ही वणवण संपण्यासाठी रहिवाशांना दिवाळी संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पाणी प्रश्नावर बुधवारी सायंकाळी सहाय्यक पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यात पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हाडा आणि पालिका प्रशासनाच्या जलविभागाचे उपअभियंते, सहाय्यक पालिका आयुक्त आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्या संयुक्त बैठकीनंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी पालिका म्हाडा प्रशासनाला मदत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
काहीच महिन्यांपूर्वी गिरणी कामगार आणि म्हाडाच्या संक्रमण शिबिरासाठी येथे २४ मजल्याच्या २० उत्तुंग इमारती उभारल्या आहेत. त्यात ५ हजार २०० कुटुंबे वास्तव्य करत आहेत. प्रत्येक व्यक्तीला ४५ लीटर प्रमाणे पालिकेकडून एका कुटूंबाला २२५ लीटर पाणी पुरवणे अपेक्षित आहे. यानुसार संपूर्ण संकुलाला ११ लाख ७० हजार लीटर पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे ४० टक्के पाण्याची टंचाई असल्याचे स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी सांगितले. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याचा आग्रह धरत संयुक्त बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.