नालेसफाई निधीचा अहवाल द्या
By Admin | Updated: July 4, 2015 01:41 IST2015-07-04T01:41:53+5:302015-07-04T01:41:53+5:30
दोन आठवड्यांपूर्वी मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत

नालेसफाई निधीचा अहवाल द्या
मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन महापालिकेस नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता ‘पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर’ यासंबंधीचा अहवाल महापौर स्नेहल आंबेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडून मागविला आहे.
रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्यासाठी महापालिकेकडून प्रतिवर्षी नियमितपणे निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, या वेळी रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई रेल्वे प्रशासनाकडून न झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरीत्या झाला नाही. त्यामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून मध्य रेल्वेच्या गाड्या ठिकठिकाणी बंद पडल्या होत्या. यावर महापालिकेच्या वतीने रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्याकरिता देण्यात आलेल्या निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, याची तपशीलवार माहिती लवकरात लवकर महापौरांनी सादर करण्यास पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे कळविले आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाकडून यासंबंधीचा अहवाल सादर झाल्याने महापालिका पुढे काय पाऊल उचलते याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.