‘एलबीजी’चा अहवाल सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 02:51 IST2015-05-05T02:51:04+5:302015-05-05T02:51:04+5:30

मेट्रो-१ प्रकल्प लांबल्याने दरवाढीबाबत नेमलेल्या लुईस बरजर समूह (एलबीएस) समितीने लावलेले निकष सदोष व अहवाल कालबाह्य तसेच

Report of 'LBG' Defective | ‘एलबीजी’चा अहवाल सदोष

‘एलबीजी’चा अहवाल सदोष

मुंबई : मेट्रो-१ प्रकल्प लांबल्याने दरवाढीबाबत नेमलेल्या लुईस बरजर समूह (एलबीएस) समितीने लावलेले निकष सदोष व अहवाल कालबाह्य तसेच दिशाभूल करणारा असल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (मेट्रो-१) कडून करण्यात आलेला आहे. अहवालाबाबत एमएमआरडीएला १० महिन्यांपूर्वी दिलेल्या पत्राला प्राधिकरणाने प्रत्युत्तर दिले नसल्याचे त्यांच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
मेट्रो-१ च्या दरवाढ निश्चित समितीने नागरिक, प्राधिकरण व संस्थाकडून मते मागविलेली आहेत. त्याबाबत लुईस बरजर समितीच्या अहवालाचे निकष दरवाढ करताना मेट्रोने विचारात घेतले नाहीत, त्यामुळे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या समितीकडे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेली आहे. हा मुद्दा खोडून काढताना मेट्रो-१ कंपनीकडून सांगण्यात आले की, ‘एलबीजी’ समिती नेमताना प्राधिकरणाने आमच्याशी संपर्क साधलेला नव्हता. उलट त्यातील मुद्दे व निकष हे पुर्णपणे विसंगत आणि चुकीचे असल्याबाबत प्राधीकरणाकडे गेल्यावर्षी जुलैमध्ये पत्र पाठवून विचारणा केलेली आहे. मात्र आजतागायत त्याबाबत एमएमआरडीएने काहीही प्रतिसाद दिलेला नाही. त्याचप्रमाणे या समितीच्या अहवालाच्या विश्वासार्हतेबाबत केंद्र सरकारने यापूर्वीच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो प्रकल्प मुदतीत पुर्ण होवू न शकल्याने खर्चामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे त्याची दरवाढ अपरिहार्य बाब बनली. एलबीजी समितीचा अहवाल हा अनुचित माहितीवर विसंबून असून तो सदोष, कालबाहय आणि दिशाभूल करणारा आहे. या समूहाच्या कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्यामुळे जागतिक बॅँकेने त्यांच्यावर बंदी घातलेली आहे, असे मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले. याबाबत एमएमआरडीएच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता ते उपलब्ध झाले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Report of 'LBG' Defective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.