पाण्यासाठी देवालाच साकडे
By Admin | Updated: July 14, 2015 23:07 IST2015-07-14T23:07:04+5:302015-07-14T23:07:04+5:30
पावसाने दिलेली ओठ, करपलेली शेती आणि प्यायच्या पाण्यासाठी मैलोन मैल करावा लागणारा प्रवास यामुळे वाढीव गावातील भगिनी अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत.

पाण्यासाठी देवालाच साकडे
पालघर : पावसाने दिलेली ओठ, करपलेली शेती आणि प्यायच्या पाण्यासाठी मैलोन मैल करावा लागणारा प्रवास यामुळे वाढीव गावातील भगिनी अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी त्यांना रेल्वे ट्रॅक आलांडावा लागतो. ही जीवघेणी कसरत करतांना चिल्यापिल्यांसाठी माता-भगिनींचा जीव टांगणीला लागतो तो वेगळात. यातून मार्ग मिळावा म्हणून ग्रामस्थांनी गावापासून दोन हजार मीटर उंचीवर असणाऱ्या देवालाच आता साकडे घातले आहे.
वाढीव गावाला दुषित पाण्याचा होणाऱ्या पुरवठ्यामुळे अनेकांना साथींच्या रोगांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच डोक्यावर हंडा घेऊन रेल्वे ट्रॅकमधून आपल्या आया बहिनीना करावा लागणारा जिवघेणा संघर्ष संपता संपत नाही. प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत सफाळा, उंबरपाडा, नंदाडे ,वाढीव, कांदरवन आदी १७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. वाढीव गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन रेल्वे ट्रॅकच्या भराव कामात दडवली गेल्याने व गळती लागल्याने वाढीव गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
काहीवेळा कांदरवन येथे बसविण्यात आलेली चावी ही काही लोकांकडून पुर्ण उघडली जात नसल्याने अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या अनेक वर्षापासून सुरूच आहे. परिणामी लोकांना जमीनीत ३-४ फुट खड्डा खणून पाणी घ्यावे लागते. या खड्ड्यांमध्ये रोज उधाणाचे पाणी शिरून त्यांतील पाणी आणखी दुषीत होते. त्यामुळे या बेटावरील २ ते ३ हजार नागरीकांना पावसाच्या साठविलेल्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
गेल्या २० दिवसापासून पालघर तालुक्यात पाऊस नसल्याने महिलांनी ड्रम, बर्णी, बाटल्या आदींमध्ये साठविलेला पाणी साठा संपुष्ठात आला आहे. त्यामुळे घरातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचे प्रदिप किणी, विनायक पाटील या तरूणांनी लोकमतला सांगितले. निदान यापुढे तरी आमच्या महिलांची पाण्यासाठी होणारी फरफट थांबावी व मुबलक पाणी मिळावे यासाठी वाढीवच्या तरूण, वृद्ध, महिलांनी जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या मेघराज देवस्थानाला साकडे घातले आहे.
इंद्र देवाच्या मामाचे गाव
सफाळे जलसार गावाजवळील २ हजार फुटावर डोंगरावर मेघराज देवस्थान असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र त्याची ख्याती आहे. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या या भागाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केला असून तिर्थक्षेत्रही जाहीर केले आहे. या डोंगरातील हौदामध्ये बाराही महिने पाणीसाठा रहात असून वाढीव गाव हे मेघराज (इंद्रदेव) यांच्या मामाचे गाव म्हणून ओळखले जात असल्याने पाऊस पडावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी डोंगरावर जात देवाला पेहराव, चांदीची अंगठी पुजारी एकनाथ भगत यांच्याकडे सुपूर्द करून मेघराजाला बसण्याची विनंती केली.