Join us

सायन उड्डाणपुलाची आजपासून दुरुस्ती; १७ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:20 IST

चालकांना करावा लागणार वाहतूककोंडीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्क :मुंबई : सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून सकाळी ५ वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवार, १४ फेब्रुवारी सकाळी ५ ते १७ फेब्रुवारी सकाळी ५ वाजेपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. महत्त्वाचा पूल बंद केल्याने या परिसरात वाहनचालकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार असल्याची भीती चालकांमध्ये आहे.

पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रखडले होते. मात्र, आता शुक्रवारपासून हे काम सुरू करण्यात येईल. वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येईल, असे एमएसआरडीसीने सांगितले. १४ फेब्रुवारी ते ६ एप्रिलपर्यंत काम सुरू राहील. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजूर केले असून पहिला ब्लॉक १७ फेब्रुवारीनंतर घेतला जाईल. उर्वरित ब्लॉकचे वेळापत्रक महामंडळाने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे असेल, असे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

मुंबई शहरात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर होत आहे. यामुळे महामंडळाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ३०० मेट्रिक टन क्षमता असलेले जादा जॅक मागविले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष बेअरिंग बदलण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू आहे. बेअरिंग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलीस करणार आहेत. यासह वाहतूक पोलिसांना मदतीसाठी महामंडळाने ३० ट्रॅफिक वॉर्डनदेखील दिले आहेत.

ब्लॉकचे वेळापत्रकच्१४ फेब्रुवारी : सकाळी ५.०० ते १७ फेब्रुवारी सकाळी ५.०० वाजेपर्यंत.च्२० फेब्रुवारी : रात्री १०.०० ते २४ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत.च्२७ फेब्रुवारी रात्री १०.०० ते २ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.च्५ मार्च रात्री १०.०० ते ९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.च्१२ मार्च रात्री १०.०० ते १६ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.च्१९ मार्च रात्री १०.०० ते २३ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.च्२६ मार्च रात्री १०.०० ते ३० मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.च्२ एप्रिल रात्री १०.०० ते ६ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत.ं