मुंबई : परळ टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीचे अंतिम टप्प्यातील काम महापालिकेने सध्या हाती घेतले आहे. पुलावरील विस्तार सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) कमी करण्याचे आणि रस्त्याचा पृष्ठभाग नव्याने करण्यात येत आहे. या कामासाठी उत्तर दिशेकडील लेन वाहतुकीसाठी बंद केली आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तत्काळ दक्षिणेकडील बाजूच्या लेनवर काम सुरू होणार आहे. संपूर्ण डागडुजी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर पालिकेचा भर आहे.
१९८० मध्ये बांधलेला परळ टीटी उड्डाणपूल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे प्रचंड वाहतूककोंडी होत असून, गर्दीच्या वेळी केवळ १०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना १० मिनिटांहून अधिक वेळ लागत आहे. या वाहतूककोंडीचा परिणाम भोईवाडा, लालबाग आदी परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात जाणवतो.
पुलावरील मोठ्या संख्येतील विस्तार सांधे झिजल्याने रस्त्याचा पृष्ठभाग असमान झाला आहे. पावसाळ्यात खड्डे पडण्याचा धोका वाढतो. यामुळे पुलाच्या डागडुजी आवश्यकता निर्माण झाली होती.
टप्प्याटप्प्याने कामे
पूल पूर्णपणे बंद केल्यास परिसरातील इतर रस्त्यांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. दादर येथील टिळक पुलासारख्या पर्यायी मार्गांवर प्रचंड कोंडी होऊ शकते. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने डागडुजी केली जात आहे. पुलाच्या संरचनात्मक मजबुतीकरणासह बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात आले आहे. विस्तार सांधे २२ वरून नऊवर आणण्यासाठी डेक कॉन्टिन्युटी निर्माण करणे, तसेच डांबरीकरणाऐवजी काँक्रीटचा वापर करण्यात येत आहे.
१७ कोटी रुपयांचा खर्च
पुलाची डागडुजी, मजबुतीकरणासाठी पालिकेने २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १७ कोटी रुपये आहे.
एक बाजू बंद
वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेनुसार,९ मार्च ते १५ एप्रिलच्या दरम्यान पुलाची उत्तर दिशेकडील बाजू सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.त्यानंतर, १६ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत दक्षिणेकडील बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवून पुढील काम करण्यात येणार आहे.
Web Summary : Paral TT flyover's final repair phase is underway, focusing on expansion joints and resurfacing. Work proceeds in stages to minimize disruption, yet traffic congestion persists. The ₹17 crore project aims to complete before monsoon.
Web Summary : परेल टीटी फ्लाईओवर की अंतिम मरम्मत जारी है, जो विस्तार जोड़ों और सतह को फिर से ठीक करने पर केंद्रित है। यातायात को कम बाधित करने के लिए काम चरणों में किया जा रहा है, फिर भी जाम की समस्या बनी हुई है। ₹17 करोड़ की परियोजना मानसून से पहले पूरी करने का लक्ष्य है।