गायकवाड कारखाना २२ वर्षांसाठी भाडेकरारान

By Admin | Updated: August 11, 2014 00:19 IST2014-08-10T23:55:58+5:302014-08-11T00:19:05+5:30

सहवीज व इथेनॉल प्रकल्प करणार : २१० कोटींची गुंतवणूक होणारे

Rent of the Gaikwad factory for 22 years | गायकवाड कारखाना २२ वर्षांसाठी भाडेकरारान

गायकवाड कारखाना २२ वर्षांसाठी भाडेकरारान

विश्वास पाटील-कोल्हापूर -- सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना कर्नाटकातील अथणी शुगर्सने २२ वर्षे भाडेकराराने चालविण्यास घेतला आहे. या करारास राज्य बँकेने मंजुरी दिली आहे. आता साखर आयुक्तांनी मंजुरी दिल्यावर त्यांना तातडीने गाळप परवाना मिळू शकेल. यंदाचा हंगाम पूर्ण क्षमतेने घेणार असून, त्याची आवश्यक ती तयारी सुरू केली असल्याची माहिती या कारखान्याचे सर्वेसर्वा श्रीमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कारखान्याची वार्षिक सभा मंगळवारी (दि. १२) होत आहे. तिथे या कराराबद्दल सभासदांना माहिती दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाड कारखान्याच्या भवितव्याबद्दल सभासदांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. म्हणून अथणी शुगर्स कोणत्या दृष्टीने या कारखान्याच्या विकासाकडे पाहते, हे जाणून घेण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला.
श्रीमंत पाटील म्हणाले, ‘यंदाचा हंगाम पूर्ण क्षमतेने घेण्याची तयारी सुरू केली आहे. आम्ही या कारखान्यामध्ये सुमारे २१० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कारखान्याची सध्याची गाळपक्षमता प्रतिदिन २५०० टन आहे. ती प्रतिदिन सात हजार टन करण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय २४ मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प व ४५ हजार लिटरचा इथेनॉल प्रकल्पही आम्ही सुरू करणार आहोत. कारखान्याचे विस्तारीकरण केल्यास उसाची गरज लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. आम्ही अथणी शुगर्समार्फत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २५ किलोमीटर परिसरात पाच हजार एकर क्षेत्राला कृष्णा नदीतून ड्रीप इरिगेशनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे. तशीच व्यवस्था या कारखान्याच्या सभासदांसाठीही करून दिली जाईल. या परिसरात सिंचनाची अडचण नाही. परंतु, नियोजनबद्ध सिंचन, चांगल्या जाती व ऊस विकास कार्यक्रम राबविला तर उसाचे मुबलक पीक उपलब्ध होऊ शकते. या सगळ््या गोष्टी टप्प्याटप्प्याने करण्यात येतील. त्यासाठी सभासद व कामगार यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कारखान्याचा विकास झाला तर पर्यायाने या दोन्ही घटकांचाच व पर्यायाने त्या परिसराचाच विकास होईल.’
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्याशी त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र, काही कामानिमित्त आपण मुंबईला जात असून, बुधवारी यासंदर्भात तपशीलाने बोलू, असे गायकवाड यांनी सांगितले.

कर्नाटकातील अथणी येथे २००१ ला खासगीकरणातून अथणी शुगर्स हा कारखाना सुरू झाला. त्याची प्रतिदिन गाळप क्षमता सध्या १२ हजार टन आहे. त्यांचा एक लाख लिटरचा इथेनॉल व ३८ मेगावॅटचा सहवीज प्रकल्प आहे.
बागलकोट जिल्ह्यात अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस या ग्रुपचा दुसरा कारखाना येत्या सहा महिन्यांत सुरू होत आहे.

कोण आहेत हे श्रीमंत पाटील...
कर्नाटकातील जनता दलाचे नेते असलेले श्रीमंत पाटील यांनी कागवाड विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळेला ते अल्पमताने हरले.. सांगलीचे काँग्रेसचे माजी आमदार मदन पाटील यांचे ते मावसभाऊ होत. त्यामुळे अथनी शुगर्स परिसराचे नाव विष्णूअण्णानगर असेच आहे. उत्तम कारखाना चालविण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे.

Web Title: Rent of the Gaikwad factory for 22 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.