Join us  

आमच्यासारखी जादा भाडेवाढ करा; महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटकला ‘सल्ला’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 2:14 AM

मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते स्वारगेट, बोरीवली ते पुणे या मार्गावर महाराष्ट्र एसटी महामंडळ आणि कर्नाटक एसटी महामंडळाच्या बस चालविण्यात येतात.

मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाने कर्नाटक एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करून, महाराष्ट्र एसटी महामंडळासारखे जादा भाडे आकरण्यास सांगितले आहे.

मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते स्वारगेट, बोरीवली ते पुणे या मार्गावर महाराष्ट्र एसटी महामंडळ आणि कर्नाटक एसटी महामंडळाच्या बस चालविण्यात येतात. मात्र, कर्नाटक एसटी महामंडळाचे भाडे कमी असल्याने ते वाढविण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई ते स्वारगेट महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या शिवनेरीचे भाडे ४४९ रुपये, तर कर्नाटक एसटी महामंडळाच्या ऐरावतचे भाडे ३६१ रुपये आहे. मुंबई ते बंगळुरू शिवशाहीचे १ हजार ८७४ रुपये, तर ऐरावतचे १ हजार २६० रुपये आहे. बोरीवली ते पुणे शिवनेरीचे भाडे ५१४ रुपये, तर ऐरावतचे भाडे ३६४ रुपये आहे. याचाच अर्थ कर्नाटक एसटी महामंडळाचे भाडे कमी आहे. त्यामुळेच हे भाडे वाढवण्यात यावे असा सल्ला महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक एसटी महामंडळाला दिला आहे.

या मार्गावरून धावणाऱ्या दोन्ही महामंडळांच्या गाड्या आरामदायी आणि अत्याधुनिक पद्धतीच्या अशा आहेत. मात्र, कर्नाटक महामंडळाच्या ऐरावतचे भाडे कमी असल्याने प्रवाशांचा कल ऐरावतकडे असतो, हे पाहायला मिळते. या कारणास्तव महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या महसुलावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, कर्नाटक महामंडळाला भाडेवाढ करण्यास पत्रव्यवहारातून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :एसटी