मुंबई : मध्य मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या दादर पश्चिमेतील कबुतरखाना अखेर हटविण्याच्या हालचाली मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याला होणारा धोका लक्षात घेता हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा पालिकेचा विचार आहे. यापाठोपाठ आता शहरात अन्यत्र असलेले कबुतरखानेही हटवावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होऊ लागली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून दादर येथे कबुतरखाना आहे. तेथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घरांच्या खिडकीत, गॅलरीत कबुतरे येत असल्याने काहीच ठेवू शकत नाही. कपडे सुकत टाकण्याच्या दोऱ्यांवरही कपड्यांपेक्षा कबुतरेच अधिक असतात. तसेच खिडकीत कबुतरांच्या विष्ठेशिवाय काहीच दिसत नाही, अशा तक्रारी रहिवाशांकडून सातत्याने येत होत्या. त्यामुळे या कबुतरखान्याविरोधात मनसेने आंदोलन केले होते. पालिकेने त्याची दखल घेत यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे ठरविले आहे. याबाबत हेरिटेज विभाग, आरोग्य विभाग आणि परीरक्षण विभाग यांची २५ मार्चला होणारी नियोजित बैठक पुढे ढकलली असली तरी आता याबाबत निर्णय होऊन प्रभादेवी येथील कीर्ती महाविद्यालय अथवा वरळी येथे मोकळ्या जागी हा कबुतरखाना हलविण्याचा पालिकेचा विचार आहे.
चुकीच्या पद्धतीने होतेय पक्ष्यांचे संगोपननिसर्गात प्रत्येक पक्षी आणि प्राण्यास अन्न उपलब्ध आहे. मात्र, त्यांना आयते खाद्य दिल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहे. चणे, फुटाणे याशिवाय चिप्सचा चुरा करून पक्ष्यांना खायला घातला जातो. मात्र, हे खाद्य त्यांच्यासाठी घातक आहे. नैसर्गिक आहाराऐवजी मिळालेला अन्नाचा अतिरिक्त साठा त्यांच्या प्रजनन क्षमतेत वाढ करतो. ज्यामुळे शहरी भागात कबुतरांची संख्या अनियंत्रित वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केवळ दादरच नाही, तर ज्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, आजारी व्यक्तींना त्रास होतो, अशा ठिकाणांवरील कबुतरखाने हटविण्याबाबत मुंबई महापालिकेने विचार करावा.ॲड. पवन शर्मा, रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअर
कबुतरखाना हटविण्याऐवजी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. यात आहार पद्धतींचे नियमन करणे, कबुतरांसाठी अनुकूल जागा तयार करणे, योग्य आहार देण्याबद्दल जनतेला शिक्षित करणे, अशा गोष्टी केल्या पाहिजेत. या उपाययोजनांचा अवलंब करून आपण पर्यावरणीय संतुलन राखू शकतो. सांस्कृतिक वारसा जपू शकतो आणि प्राण्यांच्या कल्याणाला प्राधान्य देऊ शकतो.निशा कुंजु, अम्मा केअर फाउंडेशन
भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा, भांडुप, मुलुंड, घाटकोपर अशा विविध ठिकाणी कबुतरखाने असले, तरी पालिकेकडे केवळ ४८ कबुतरखान्यांची नोंदणी आहे. तेथे येणाऱ्या कबुतरांमुळे श्वसनाचे विकार बळावत असल्याने कबुतरखाने हटवावेत, अशी मागणी अनेक ठिकाणचे स्थानिक रहिवासी करत आहेत. दुसरीकडे, पक्ष्यांना खायला घालू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे फलक पालिकेने कबुतरखान्यांभोवती लावले आहेत.