संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही
By Admin | Updated: September 17, 2014 01:00 IST2014-09-17T00:59:47+5:302014-09-17T01:00:06+5:30
शरद पवार : कोल्हापुरातून फुंकले प्रचाराचे रणशिंग; महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट1

संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही
कोल्हापूर : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतून निर्माण केला जात आहे. याच धर्मसंसदेने कधी काळी शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांना वेगळी वागणूक दिली होती. या देशाला फक्त एकच संसद माहीत आहे व ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने अस्तित्वात आली आहे. धर्माच्या नावाने चालणारी संसद कुणी मजबूत करीत असेल तर अशी सांप्रदायिक विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, मंगळवारी येथे झालेल्या विराट प्रचार प्रारंभ सभेत व्यक्त केला़
पवार यांच्या हस्ते नारळ फोडून राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. या सभेच्या निमित्ताने प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली. सभेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीतील लाट शंभर दिवसांत ओसरली, त्यामुळे तो पराभव आता विसरून चला. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचीच लाट असून राज्यातील जनतेने पुन्हा ‘राष्ट्रवादी’च्याच हातात सत्ता द्यावी. देशात नावलौकिक होईल असा कारभार करून दाखवू, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी आपल्या पंधरा मिनिटांच्या भाषणात दिली.
या सभेत पवार यांनी राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामाच मांडला. ते म्हणाले, ‘देश व राज्यभर लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असताना कोल्हापूरने मात्र पुरोगामी विचारांची कास सोडली नाही. येथून धनंजय महाडिक यांना विजयी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचा ऋणी आहे.
भाजपच्या सरकारबद्दलची नाराजी जनतेने तीन महिन्यांत व्यक्त केली आहे. महाराष्ट्र बलवान करायचा असेल तर राष्ट्रवादीला शक्ती द्या. नवी पिढी राष्ट्रवादीच्या बाजूने उभी राहत आहे, त्यांना ताकद देऊ.
काही चेहरे बदलायला लागले तर अवश्य बदलू. महाराष्ट्राचे पुढच्या वीस वर्षांचे नेतृत्व करु शकेल अशी नेतृत्वाची फळी राष्ट्रवादीकडे आहे. आम्हांला पुन्हा सत्ता द्या. हे राज्य आताही देशात एक नंबरचे आहेच. देशाचा राज्यकारभार कसा करायचा याचा धडा घेता येईल इतका चांगला कारभार करून दाखवू.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री शशीकांत शिंदे, खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार के.पी.पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची भाषणे
झाली. आभार आर. के. पोवार यांनी मानले.
‘राष्ट्रवादी’चा
जाहीरनामा
६५ वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व कोरडवाहू शेतकऱ्यांना पेन्शन देणार
राज्यातील ६० टक्के शेती
ठिबकखाली आणणार
ठिबक सिंचनासाठी
७५ टक्के अनुदान देणार
शेतकऱ्यांना लागेल
तेवढी वीज देऊ
सर्वांसाठी आरोग्य विमा लागू करणार
इतर मागासवर्गीय समाजासाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग
अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद महामंडळासाठी २ हजार कोटींची तरतूद करणार
राज्यातील २८ हजार गावांत काँक्रीटच्या गटारी, अंतर्गत रस्ते करू
तर नवरा कोण, बायको कोण ? : छगन भुजबळ
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘शिवसेना-भाजपचे नेते जागावाटपावरून एकमेकांना नवराबायकोची उपमा देऊ लागले आहेत. उद्या १४४-१४४ असे जागावाटप झाले तर नवरा कोण व बायको कोण होणार...? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली; परंतु तिचा अहवाल अजून का प्रसिद्ध केला जात नाही..? भाजपच्या कार्यकारिणीत सहस्त्रबुद्धे, महाजन येतात, मग त्यामध्ये पाशा पटेल, फुंडकर का चालत नाहीत..? ओबीसी समाजाचे काम करणाऱ्या नेत्यांना श्रीमंत देवेंद्र फडणवीस हे जर नौटंकी म्हणत असतील तर मग मुंडे हेदेखील नौटंकी करत होते असे त्यांना म्हणायचे आहे का? अशी विचारणाही भुजबळ यांनी केली. भाजपने कितीही वल्गना केल्या तरी आम्ही घेतलेले निर्णय बदलण्याची कुणाच्या बाप्पाची हिंमत नाही.’