धर्म बालगुन्हेगारी शिकवत नाही!
By Admin | Updated: January 6, 2015 02:28 IST2015-01-06T02:28:34+5:302015-01-06T02:28:34+5:30
कोणत्याही धर्मग्रंथात मला बालगुन्हेगारी, बालमजुरीची शिकवण असलेली दिसली नाही. उलट प्रत्येक धर्माचा आधार करुणा हाच आहे.

धर्म बालगुन्हेगारी शिकवत नाही!
कैलाश सत्यार्थी यांचे मत : विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्हावा
मुंबई : कोणत्याही धर्मग्रंथात मला बालगुन्हेगारी, बालमजुरीची शिकवण असलेली दिसली नाही. उलट प्रत्येक धर्माचा आधार करुणा हाच आहे. धर्माच्या नावावर मुलांवर होणारे अत्याचार दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.
मुंंबई विद्यापीठात सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जगात आजही १ कोटीहून अधिक गरीब मुलांना पिण्याचे पाणी मिळत नाही. तर १७ कोटी मुले बालमजुरीच्या खाईत लोटली गेली आहेत. तसेच १५ कोटी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावर शाळा सोडल्या आहेत. मात्र याकडे जगाचे लक्ष जात नाही. या गरीब मुलांची भूक आपण कशी मिटवू, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांच्या समस्यांवर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. प्रत्येक मुलास शिक्षण आणि अधिकार कसे मिळतील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत़ त्यातूनच आपला देश संपन्न राष्ट्र आणि महासत्ता बून शकेल. देशातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. मात्र देशाला वैज्ञानिक व तंत्रज्ञ द्यायचे असल्यास त्यासाठी समान, गुणवत्तापणर््ूा शिक्षण आणि हक्काचे शिक्षण मिळाले पहिजे. त्यातूनच बालमजुरी व बालगुन्हेगारीला आळा बसू शकेल, असेही सत्यार्थी म्हणाले.
आपण फेसबुक, वॉट्सअॅप आदी सोशल नेटवर्किंगमुळे जवळ आलो असलो तरी तितकेच मानवी संवेदनापासून आणि माणसाला एकमेकांशी जोडण्याच्या प्रक्रियेपासून दूर जात आहोत. समाजात दुरावा निर्माण झाला असून, तो भरून काढण्याची आणि माणसांना जोडण्याची प्रक्रिया वाढली पाहिले. -कैलाश सत्यार्थी