Join us  

"महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी"; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 7:48 PM

कलाप्रेमी असलेल्या ईशा अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेल्या सर्व कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नेतृत्व करतात.

मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी  रिलाइन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेदेखील उपस्थित होते. ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन तसेच धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या मंडळांच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. "हा सन्मान माझ्यासाठी खूप विशेष आहे. कारण माझी आई नीता अंबानी यांनाही २०१६ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आमच्या कुटुंबासाठी महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी आहे," असं हा पुरस्कार स्वीकारताना ईशा अंबानी यांनी म्हटलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या विशेष पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या ईशा अंबानी यांनी येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यासात दुहेरी पदवी प्राप्त केली. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए देखील केले आहे. ३२ वर्षीय ईशा अंबानी यांनी रिलायन्स रिटेलच्या विस्ताराला चालना दिली असून  त्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांनी रिलायन्स रिटेलसाठी डिजिटल फूटप्रिंटच्या विस्ताराचे नेतृत्व केले असून ई-कॉमर्स व्यवसाय अजियो आणि टीरा यासारखे ऑनलाइन ब्युटी प्लॅटफॉर्म सुरू केले. काही भारतीय ब्रँडचे अधिग्रहण आणि नवीन ब्रँडच्या शुभारंभासह रिलायन्स रिटेलच्या स्वतःच्या ब्रँड पोर्टफोलिओच्या विस्तारात ईशा अंबानी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशनने केलेल्या अनेक कामांमध्येही ईशा अंबानी या सक्रियपणे सहभागी आहेत. कलाप्रेमी असलेल्या त्या रिलायन्स फाऊंडेशनने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेल्या सर्व कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नेतृत्व करतात. शैक्षणिक क्षेत्राची आवड असलेल्या ईशा अंबानी या मुले आणि महिलांसोबत रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत.

२०२३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या शुभारंभ आणि कामकाजातही ईशा अंबानी यांचा सहभाग आहे. जगभरातील उद्योगांमधील उदयोन्मुख सेलिब्रेटींच्या टाइम मासिकाच्या टाइम १०० मध्येही त्यांचे नाव आले असून फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स २०२३ मध्येही त्यांना प्रतिष्ठित जेननेक्स्ट उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :ईशा अंबानीमुकेश अंबानीलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024लोकमतरिलायन्स